दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा उत्साहात | पुढारी

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा उत्साहात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गावर असलेल्या महाराष्ट्र सदनात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. तर, कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते भगव्या पताका लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी उभारण्यात आली. गोडसे यांनी गुढी उभी केली. व गुढीची पूजा करुन उपस्थित सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिन्नर तालुक्यातील बेलु येथील वारकरी शिक्षण संस्थेचे हरीभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल वीस बालगोपाल वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरणाप्रमाणे ‘गुढीया तोरणे, करती कथा गाणे’ तर संत चोखोबांच्या अभंगातील चरणानुसार ‘गुढी उभारावी टाळी वाजवावी वाट ही चालावी पंढरीची’ या अभंगांसह या राजधानी वरती भगवा निशान आहे, अशा विविध स्फूर्तीदायक गीतांवर गळ्यात टाळ, हाती वीणा, तर मृदुंगाच्या तालावर पावल्यांसह फुगड्या खेळत नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा  

Back to top button