एक लाख कोटीच्या ‘शत्रू मालमत्तां’चा होणार लिलाव; केंद्राकडून प्रक्रिया सुरू | पुढारी

एक लाख कोटीच्या ‘शत्रू मालमत्तां’चा होणार लिलाव; केंद्राकडून प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील तब्बल एक लाख कोटी रुपये किमतीच्या ‘शत्रू मालमत्तां’च्या लिलाव तथा विक्रीची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली असून, त्यातील सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत केंद्र सरकारने अशाप्रकारच्या जंगम मालमत्तांच्या लिलावातून 3 हजार 400 कोटींची कमाई केली आहे.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वाधिक शत्रू संपत्ती किंवा मालमत्ता उत्तर प्रदेशमध्ये असून, त्यांची संख्या 6 हजार 255 आहे. म्हणजेच हे प्रमाण एकूण ‘शत्रू मालमत्तां’च्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 4 हजार 88 मालमत्ता आहेत. दिल्लीत 659 आणि गोव्यात 295 ‘शत्रू मालमत्तां’ आहेत. महाराष्ट्रातील ‘शत्रू मालमत्तां’ची संख्या 208 आहे. त्यानंतर तेलंगणा (158), गुजरात (151), त्रिपुरा (105), बिहार (94), मध्य प्रदेश (94) छत्तीसगड (78) आणि हरियाणा (71) या राज्यांचा क्रमांक लागतो. केंद्र सरकारने गेल्यावर्षी यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली होती.

‘शत्रू मालमत्ता’ म्हणजे काय?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानमध्ये किंवा चीनमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांची किंवा फर्म-कंपन्यांची मालमत्ता भारताकडून ‘शत्रू मालमत्ता’ किंवा संपत्ती म्हणून जाहीर केली जाते. यासंदर्भात भारत सरकारने 10 सप्टेंबर 1959 रोजी पहिला अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर 18 डिसेंबर 1971 रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला. शत्रू देशात राहणार्‍या व्यक्तींची मालमत्ता किंवा संपत्ती म्हणजे ‘शत्रू मालमत्ता’ अथवा संपत्ती होय. अशा सर्व मालमत्तांचा केंद्र सरकारकडून लिलाव करण्यात येतो.

Back to top button