साता जन्माचे नातं सात तासात तोडले! नववधूने लग्‍न मोडण्‍याचे कारण ऐकून तुम्‍ही हैराण व्‍हाल | पुढारी

साता जन्माचे नातं सात तासात तोडले! नववधूने लग्‍न मोडण्‍याचे कारण ऐकून तुम्‍ही हैराण व्‍हाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, लग्न (Marriage)  म्हणजे सात जन्माचे बंधन, अशी आख्यायिका पूर्वापार चालत आली आहे. परंतु एका नववधूने अवघ्या सात तासापूर्वी झालेले लग्न मोडून माहेरचा रस्ता धरला. ही घटना उत्तर प्रदेशातील बनारस येथे घडली.

बनारस येथे राहणाऱ्या वैष्णवीचे लग्न बिकानेर येथे राहणाऱ्या रवीसोबत गुरुवारी झाले. रवी मिरवणुकीने बनारसला पोहोचला होता. अधिक खर्च टाळण्यासाठी वैष्णवी आणि रवीने आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर लग्न केले होते. लग्नानंतर (Marriage)  वैष्णवी रवीसोबत सासरी जाण्यासाठी निघाली. ४०० किमी अंतर कापल्यानंतर उर्वरित ९०० किमीचे अंतर पाहून वैष्णवी बैचेन झाली. तिने एका पंपावर गाडी थांबून पोलिसांना सांगितले की, मला खूपच लांब असणार्‍या सासरच्या घरी जायचे नाही. यावर पोलिसांनी तिची खूप समजूत घातली. परंतु ती जाण्यास तयार झाली नाही. अखेर वैष्णवीला पोलिसांनी तिच्या आईकडे पाठवले.

सात तास गाडीत बसून थकले, मला हे लग्न मोडावे लागणार

लग्नानंतर रवी आणि वैष्णवीला सुमारे १३०० किमी अंतर कापून बिकानेरला जायाचे होते. ते दोघे कारमधून बिकानेरला जायाला निघाले. सुमारे ४०० किमीचे अंतर सात तासांत कापून वधू-वर कानपूरच्या सरसौल भागात पोहोचले. येथे दूध माता पेट्रोल पंपाजवळ त्यांनी चहा-नाश्त्यासाठी कार थांबवली. काही वेळाने वैष्णवी जोरजोरात रडू लागली. नववधूला रडताना पाहून पंपावर उपस्थित असलेल्या पीआरव्ही व्हॅनमधील पोलीस तिच्याजवळ आले. आणि तिची विचारपूस करू लागले. यावेळी वैष्णवीने सांगितले की, लग्नापूर्वी रवीच्या कुटुंबीयांनी प्रयागराजमध्ये राहत असल्याचे आम्हाला सांगितले होते; पण आता ते मला बिकानेरला घेऊन जात आहेत. सात तास गाडीत बसून थकले आहे, पुढे जाण्याची इच्छा होत नाही. मला आता हे लग्न मोडावे लागणार आहे. मला इतक्या दूर लग्न करायचे नव्हते, मला माझ्या आईच्या जवळ राहायचे आहे, असे सांगतातच सर्वजण आश्चर्यचकित झाले. वैष्णवीचे बोलणे ऐकून पोलीसही चक्रावले.

Marriage : पोलिसांनी वधूची पाठवणूक केली माहेरी

पोलिसांनी रवी आणि वैष्णवीला महाराजपूर पोलीस ठाण्यात आणले. वैष्णवीच्या कुटुंबीयांना लग्नाबद्दल संपूर्ण माहिती असल्याचे रवीने पोलिसांना सांगितले. आपण कुठे राहतो आणि काय करतो? हेही सांगितले. लग्नानंतर वैष्णवी ४०० किलोमीटर अंतर कापून आली. मात्र आता तिला पुढे जायचे नाही. तिला हे लग्न मोडायचे आहे. यानंतर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश राठोड यांनी वैष्णवीच्या आईला फोन करून बोलावून घेतले.

मुलीच्या संमतीशिवाय काहीही होणार नाही…

आईने पोलिसांना सांगितले की, “एका नातेवाईकाने हे लग्न लावले होते. आम्हाला एवढंच माहीत होतं की रवीचे कुटुंब प्रयागराजमध्ये राहत आहे. मुलीला बिकानेरला जायचे नसेल आणि तिला लग्न मोडायचे असेल, तर तिला माझ्याकडे पाठवा. मुलीच्या संमतीशिवाय काहीही होणार नाही, आम्ही हे लग्न मोडत आहोत.”

यावर पोलिसांनी वधू-वरांना समोरासमोर बसवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वैष्णवी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला लांबच्या अंतरावरील सासरी जायचे नव्हते. खूप प्रयत्न करूनही वैष्णवी पतीसोबत जाण्यास तयार होत नसल्याने महिला पोलिसांसह तिला तिच्या आईसोबत बनारसला पाठविण्यात आले.  रवी वधूला न घेता बिकानेरच्या दिशेने रवाना झाला.

हेही वाचा 

Back to top button