पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये महिलांबाबत एक विधान केले होते. त्याबाबत माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलीस राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. 16 मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस दिली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले नसल्याने विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांच्यासह पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
भारत जोडो यात्रा श्रीनगरमधून जाताना राहुल गांधी म्हणाले होते की, अनेक महिलांनी त्यांच्याकडे लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत. आजही महिलांसोबत लैंगिक छळ होत आहे. दिल्ली पोलिसांनी त्या पीडित महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी 16 मार्च रोजी राहुल गांधींना नोटीस दिली होती. विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी सांगितले की, "राहूल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले की, यात्रेदरम्यान ते अनेक महिलांना भेटले, अनेक महिलांनी त्यांना सांगितले की त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला. आम्ही त्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत."
याबाबत आपचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, केंद्र सरकार आपल्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. राहुल गांधींसोबतही एजन्सीचा गैरवापर होत असेल, तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.