पुढारी ऑनलाईन: खलिस्तान समर्थक आणि 'वारस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी राज्य पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी एजन्सींकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ही परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने हताळण्यासाठी आणि कायदा सुव्यस्था लक्षात घेता, पंजाब सरकारने इंटरनेट आणि दूरसंचार सेवेवर निर्बंध आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या १२ तासांसाठी राज्यातील सर्व इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद करण्याचे आदेश पंजाब सरकारने दिले आहेत. काल (दि.१९) दुपारपर्यंत देखील सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा काही काळासाठी स्थगित केली होती.
पंजाब सरकारच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने पंजाबमधील मोबाइल, इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या सर्व डोंगल सेवा (व्हॉईस कॉल वगळता) पंजाबच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील या सर्व सेवा 20 मार्चपर्यंत (12:00 तास) बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंजाब सरकारने दिली आहे.
खलिस्तानी शक्तींना एकत्र करणारा अमृतपाल सिंग ( वय ३० ) पंजाबमध्ये 'वारीस पंजाब दे' ही संघटना चालवतो. ही संघटना अभिनेता-कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी स्थापन केली होती. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंह यांनी या संघटनेची सूत्रे आपल्याकडे घेतली. तो या संघटनेचा प्रमुख झाला. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर 'वारीस पंजाब दे' वेबसाइट तयार करून लोकांना जोडण्यास सुरुवात केली. अमृतपाल २०१२ मध्ये दुबईला गेला होता. त्यांचे बहुतेक नातेवाईक दुबईत राहतात. अमृतपाल याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी पंजाबमधील अजनाळा येथील पोलीस ठाण्यावर शस्त्रांसह हल्ला केला होता.अमृतपालच्या समर्थकांनी अपहरण आणि दंगलीतील एक आरोपी तुफानच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी अमृतपाल सिंग यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले होते.
अमृतपाल यांच्या माजी सहकारी बरिंदर सिंग याने त्याच्याविरोधात पहिली तक्रार दिली होती. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, तो अमृतपाल सिंगचा चाहता होता, पण जेव्हा त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर उघड केल्या तेव्हा अमृतपाल सिंग याला राग आला. अमृतपाल सिंग याने बरिंदरला शिवीगाळ करत मारहाण केली. रुपनगर जिल्ह्यातील सलेमपूर गावातील रहिवासी असलेल्या बरिंदरला अमृतपाल व त्याच्या साथीदारांनी तीन तास मारहाण केल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. तसेच बरिंदर सिंग यांनी अमृतपाल सिंग याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.