ड्रायक्लीनिंगचे रसायन घातक; अमेरिकेत संशोधन | पुढारी

ड्रायक्लीनिंगचे रसायन घातक; अमेरिकेत संशोधन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कपडे ड्रायक्लीन करण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन घातक असून, हे कपडे परिधान करणाऱ्यांना त्यातून पार्किन्सन्स आजार होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधानातून पुढे आला आहे.

‘ट्रायक्लोरोइथिलीन’ (टीसीई) हे रसायन कपडे ड्रायक्लीन करण्यासाठी वापरले जाते. हेच रसायन लष्करी आणि वैद्यकीय वापराच्या उपकरणांसाठी वापरले जाते. इंजिन स्वच्छ करण्यासाठी आणि रंग हटविण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो, असे अमेरिकेतील रोश्टर मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी म्हटले आहे. १९७० पासून या रसायनाचा घरगुती वापर कमी झाला आहे, परंतु कोणत्याही धातूवरचा गंज काढण्यासाठी आणि ड्रायक्लीनिंगसाठी आजही ते सर्रास वापरले जाते. हे रसायन मेंदूत जाऊन मेंदूतील ‘मायटोकॉन्ड्रिया’ पेशींचा नाश करू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी पार्किन्सन्स आजार झालेल्या सात जणांची निवड केली होती. त्यातूनच या रसायनाचे परिणाम लक्षात आले. या शास्त्रज्ञांनी ख्यातनाम बास्केटबॉल खेळाडू ब्रायन ग्रँट यांचाही अभ्यास केला. ते एनबीए स्पर्धेत १२ वर्षे खेळले आणि वयाच्या ३६व्या वर्षी त्यांना पार्किन्सन्स झाला होता.

जमीनही दषित होण्याची शक्यता

टीसीईचा वापर शरीरातील शिरांमधील डोपामाईन तयार करणाऱ्या पेशींसाठी घातक ठरतो, ज्यामुळे पार्किन्सन्स होतो. ‘जर्नल ऑफ पार्किन्सन्स’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात संशोधकांनी असे म्हटले आहे की, खुल्या हवेतूनही या रसायनाचा संसर्ग होतो आणि जमिनीतील प्रदूषित पाणी, तसेच घरातील हवेतून ते श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाऊ शकते. टीसीई हे इतके घातक रसायन आहे की, त्यामुळे जमीन आणि भूगर्भातील पाणीही दूषित होऊ शकते. नद्यांमध्ये ते मिसळले गेले तर मोठा धोका उद्भवू शकतो. या रसायनाचे बाष्पीभवन सहज होते. त्यामुळे ते बाष्प घरे, शाळा आणि कार्यालयांमध्येही पसरू शकते.

Back to top button