राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

लखनौ, पुढारी ऑनलाईन : योगी सरकारने यूपी स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या 18,000 कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीने बुधवारी 11 टक्के अधिक महागाई भत्ता देण्यास मान्यता दिली. समितीच्या या निर्णयामुळे आता 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारी 2023 पासून हा भत्ता आगामी पगारासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती रोडवेज एम्प्लॉईज जॉइंट कौन्सिलचे सरचिटणीस गिरीश चंद्र मिश्रा यांनी दिली.

यूपी स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी 17 टक्के महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान, कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी परिषदेकडून करण्यात आली होती. पण समितीने 11 टक्के महागाई भत्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 2500 वरून 8000 रुपये होईल. परिवहन महामंडळाचे एमडी संजय कुमार यांनी सांगितले की, प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने 11 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याबद्दल युनियनने व्यक्त केला आनंद

उत्तर प्रदेश रोडवेज एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सिंह यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांची महागाई भत्त्यासह अनेक मागण्यांवर भेट घेतली. महागाई भत्त्याची मागणी पूर्ण झाल्याबद्दल युनियनने आनंद व्यक्त केला आहे. रोडवेज एम्प्लॉईज युनियनचे राज्य माध्यम प्रभारी रजनीश मिश्रा यांनी ही माहिती दिली.

Back to top button