पाच वर्षांच्‍या लैंगिक संबंधांना बलात्‍कार म्‍हणता येणार नाही : कनार्टक उच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण | पुढारी

पाच वर्षांच्‍या लैंगिक संबंधांना बलात्‍कार म्‍हणता येणार नाही : कनार्टक उच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे पाच वर्ष संबंधित तरुणीच्‍या इच्छेविरुद्ध दोघांमध्‍ये लैंगिक संबंध निर्माण झाले, असे म्‍हणता येणार नाही. पाच वर्षांच्‍या लैंगिक संबंधांना बलात्‍कार म्‍हणता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच एका खटल्‍याच्‍या सुनावणीवेळी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. तसेच याप्रकरणी पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा खटलाही रद्द करण्‍यात आला.

काय होते प्रकरण ?

तरुण आणि तरुणीचे प्रेम जुळले. दोघांची कुटुंब एकमेकांना ओळखत होते. दीर्घकाळाच्‍या नात्‍यानंतर दोघांनी विवाह करण्‍याचा निर्णय घेतला.  मात्र लग्‍नाच्‍या बोलणीवेळी भिन्‍न जातींमुळे तरुणाच्‍या कुटुंबीयांनी  लग्‍नास विरोध केला.दोघांच्‍या नात्‍यात दुरावा निर्माण झाला. यानंतर पाच वर्षांच्‍या काळात तरुणाने लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्‍कार केला, अशी फिर्याद संबंधित तरुणीने दिली. तरुणावर बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल झाला होता. तो रद्द करावा, यासाठी तरुणाने कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.  यावर एक सदस्‍यीय खंडपीठाचे न्‍यायमूर्ती एन. नागप्रसन्‍ना यांच्‍या समोर सुनावणी झाली.

दोघांचे नाते सहमतीने होते यामध्‍ये कोणतीही जबरदस्‍ती नव्‍हती

ही याचिका निकालात काढताना न्‍यायमूर्ती एन. नागप्रसन्‍ना यांनी स्‍पष्‍ट केले की, या प्रकरणातील तक्रारदार तरुणीने लग्‍नाचा आग्रह धरला. दोन्‍ही कुटुंब एकमेकांना ओळख होते. तरुण-तरुणी एकमेकांच्‍या प्रेमात होते. पाच वर्षांच्‍या कालावधीत त्‍यांनी अनेकवेळा शरीरिक संबंध ठेवले . दोघांचे नाते सहमतीने होते यामध्‍ये कोणतीही जबरदस्‍ती नव्‍हती. संबंधित जोडप्‍याने पाच वर्ष शारीरिक संबंध ठेवले त्‍याचबरोबर अनेक वेळा अर्थिक व्‍यवहारही केला. मात्र लग्‍नाची बोलणी फिस्‍कटल्‍यानंतर दोघांच्‍या नात्‍यांमध्‍ये दुरावा निर्माण झाला.

अशा प्रकरणात बलात्‍काराचा आरोप केला जाऊ शकत नाही

आरोपीने सुरुवातीला जबदस्‍तीने शारीरिक संबंध ठेव्‍याचे फिर्यादीतमध्‍ये तरुणीने म्‍हटले असले तरी,दोघांमध्‍ये सलग पाच वर्ष लैंगिक संबंध सुरु होते. पाच वर्षांपर्यंत संबंधित तरुणीच्‍या संमती किंवा इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध निर्माण झाले असे म्‍हणता येणार नाही. पाच वर्षांच्‍या लैंगिक संबंधांना बलात्‍कार म्‍हणता येणार नाही, त्‍यामुळे आरोपीवरील बलात्‍कारचा खटला रद्द करण्‍यात येत असल्‍याचे न्‍यायमूर्ती एन. नागप्रसन्‍ना यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button