व्लादिमीर पुतिन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर, G20 परिषदेत सहभागी होण्याची शक्यता | पुढारी

व्लादिमीर पुतिन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर, G20 परिषदेत सहभागी होण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) भारतात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. पुतिन भारतातील शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत का, असे विचारले असता, पेस्कोव्ह यांनी सांगितले की, “हे शक्य होऊ शकते. पण अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही,” असे वृत्त रशियन वृत्तसंस्था Tass ने दिले आहे.

G20 मध्ये रशियाचा संपूर्ण सहभाग आहे. तो पुढेही कायम राहील, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. जी-२० आंतरराष्ट्रीय गटाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. G20 हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय फोरम आहे.

गेल्या वर्षी, G20 नेत्यांच्या मंचावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. २०२० आणि २०२१ मध्ये पुतिन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे G20 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. २०१९ मध्ये ते जपानमध्ये झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत सहभागी झाले होते.

या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीत झालेल्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीला लावरोव्ह उपस्थित राहिले होते.

Back to top button