लंडनमध्ये बसून काही लोक भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करतात : पंतप्रधान मोदी | पुढारी

लंडनमध्ये बसून काही लोक भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करतात : पंतप्रधान मोदी

बंगळूर; वृत्तसंस्था :  काही लोक परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी रविवारी येथे सोडले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. भारतात लोकशाहीला हजारो वर्षांचा इतिहास आहे, हेच त्यांना माहिती नाही. जगातील कुठलीही शक्ती भारतीय लोकशाहीला बाधा पोहोचवू शकत नाही. पण, आपल्यातलेच काही जगभरात जाऊन तिची बदनामी करतात तेव्हा यातना होतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदीसाठी थडगे खणण्यात काँग्रेससह सारे विरोधक व्यग्र आहेत. मोदींना संपविणे, हे विरोधकांचे एकमेव लक्ष्य आहे; पण हा मोदी फार मोठे ध्येय बाळगून आहे. माझे सारे लक्ष देश उभा करण्याकडे आहे. म्हणून मी विकासकामांमध्येच व्यग्र आहे. विरोधकांनी मिळून मोदीच्या थडग्यासाठी कितीही मोठा खड्डा खणला तरी देशातील जनता मोदींना त्यात पडू देणार नाही. 140 कोटी भारतीय हेच माझे एकमेव सुरक्षाकवच आहे, असे भावोद्गार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी येथे काढले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी धारवाड, मंड्या, बंगळूर आदी ठिकाणी मिळून 16 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांना दोन महिने उरले असताना मंड्या, हुबळी, धारवाडला मोदी आले. काँग्रेस-जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या मंड्यात त्यांनी दिमाखदार रोड शो केला. यानंतर विराट जनसभेला त्यांनी संबोधित केले.

16 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

होसपेट-हुबळी-टीनाघाट रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, आयआयटी धारवाड, 530 कोटींचा हुबळी स्मार्ट सिटी प्रकल्प, 1040 कोटींची धारवाड पाणीपुरवठा योजना, 150 कोटींचा तुप्पारीहल्ला पूररोधक प्रकल्प, 12608 कोटी रुपयांच्या बंगळूर- म्हैसूर हायवेअंतर्गत 6 लेन राष्ट्रीय महामार्ग असे जवळपास 16 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. बंगळूर-म्हैसूर अंतर कापायला पूर्वी तीन तास लागत होते. आता 75 मिनिटे लागतील. म्हैसूर-कुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणीही मोदींनी केली. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किलोमीटरचा हा मार्ग विकसित केला जाणार आहे.

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म

श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी 1,507 मीटर म्हणजे सुमारे दीड किलोमीटर आहे. होसापेटे रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही झाले. हंपी स्मारकांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर हे स्थानक विकसित करण्यात आले आहे.

Back to top button