अबब! केरळमध्ये तापमान चक्क 54 अंश सेल्सिअस | पुढारी

अबब! केरळमध्ये तापमान चक्क 54 अंश सेल्सिअस

तिरुवनंतपूरम, वृत्तसंस्था : काही महिन्यांपूर्वीच अतिवृष्टीचा सामना करणारे केरळ राज्य आता अतिउष्णतेचा सामना करत असून, राज्याच्या काही भागांत तापमान तब्बल 54 अंश नोंदवले गेले आहे. हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा निर्देशांक अर्थात हिट इंडेक्सच्या माध्यमातून हे तापमान नोंदवले गेले आहे. तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उष्माघात आणि इतर धोके उत्पन्न होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या काही भागांत हा हिट इंडेक्स 54 अंशांपर्यंत पोहोचला आहे.

केरळमधील तिरुवनंतपूरम, अलपुझ्झा, कोट्टायम, कन्नूर, एर्नाकुलम, कोझीकोड येथे गुरुवारी 45 ते 54 अंश तापमान नोंदवले गेले. ही स्थिती धोकादायक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

साधारणपणे कासारगोड, कोझीकोड, मलप्पूरम, कोल्लम, पटनमतिट्टा आणि एर्नाकुलम येथे साधारणपणे 40 ते 45 अंश तापमान असते; पण तेही आरोग्यासाठी धोकादायक असते, असे प्रशासनाने म्हटले आहे. इडुक्की आणि वायनाड या दोन जिल्ह्यांत मात्र हिट इंडेक्स 29 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तापमान जास्त असलेल्या पलक्कड जिल्ह्यात यंदा मात्र तापमान कमी नोंदवले जात आहे. दरम्यान, हे तापमान हिट इंडेक्सच्या माध्यमातून नोंदले गेले असून, हवामान खात्याची माहिती वापरून हिट इंडेक्सचा नकाशा राज्य आपत्ती निवारण प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत हवामान खात्याने काही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

काय धोका होऊ शकतो?

बराच वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते व उष्माघाताचा झटका येऊ शकतो, अशी माहिती देत प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना केल्या आहेत.

काय असतो हिट इंडेक्स

हिट इंडेक्स म्हणजे हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता याचा निर्देशांक आहे. माणसाला जाणवणारी अथवा भासणारे तापमान, असेही म्हणू शकतो. मोबाईलवर तापमानाच्या नोंदीत फील्स लाईक टेम्परेचर अशी नोंद येते तो हा आकडा असतो. अनेक देश या हिट इंडेक्सचा वापर आरोग्यविषयक सूचना अथवा इशारा देण्यासाठी वापरतात.

Back to top button