पिंपरी : लेखा परीक्षण आक्षेपांच्या पूर्ततेसाठी दरमहा बैठक; महापालिका आयुक्तांचे आदेश | पुढारी

पिंपरी : लेखा परीक्षण आक्षेपांच्या पूर्ततेसाठी दरमहा बैठक; महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाच्या कामातील लेखा परीक्षणामध्ये मोठ्या संख्येने आक्षेप प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे लेखा परीक्षणातील प्रलंबित आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. महापालिकेत मिळकतकर वसुली विभाग, स्थापत्य विभाग, बांधकाम परवानगी, वैद्यकीय विभाग, भांडार हे महत्त्वाचे आहेत.

तर, पालिकेच्या प्रत्येक विभागांच्या फायलीचे लेखा परीक्षण विभागामार्फत आक्षेप काढून त्रुटी दूर करण्याचे कामकाज असते. सन 2005 ते 2015 या दहा वर्षांतील सर्व विभागांच्या फायलींमधील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्तांनी मार्च 2023 चे उदिष्ट निश्चित करून दिले आहे. या कालावधीत जे आक्षेप असतील त्याची माहिती लेखा परीक्षण विभागाला सादर करण्याची सूचना आयुक्त सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहेत.

त्रैमासिक अहवाल सादर करा
या दहा वर्षांतील लेखा परीक्षणातील प्रलंबित आक्षेपांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नियमितपणे याचा पाठपुरावा होणे आवश्यक आहे. यासाठी आयुक्तांनी एक कार्यपध्दती निश्चित केली आहे. लेखा परीक्षणातील प्रलंबित आक्षेपांसाठी मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांनी बैठकांचे आयोजन व समन्वयक म्हणून कामकाज करावे. तसेच, आक्षेपांची सविस्तर माहिती सादर करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर दिली आहे. लवकरात-लवकर लेखा परीक्षण होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त यांच्या पातळीवर दर महिन्यामध्ये बैठकीचे आयोजन करावे. तसेच, त्रैमासिक अहवाल माझ्याकडे सादर करावा, असे आयुक्त सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

Back to top button