कोहिमा; वृत्तसंस्था : 60 सदस्य असलेल्या नागालँड विधानसभेत तिसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 आमदारांसह सत्ताधारी 'एनडीपीपी'-भाजप आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, 'एनडीपीपी'-भाजप युतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मागितलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःहून आघाडीत सहभागी झाला आहे.
नागालँडमध्ये अशाप्रकारे सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले असून, ही देशातील अशा स्वरूपाची पहिलीच घटना मानली जाते. भाजपसोबत युती करून 'एनडीपीपी' पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल युनायटेडसह सर्व राजकीय पक्षांनी भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 'एनडीपीपी' आणि भाजपने 2 मार्चच्या निवडणूक निकालात अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या. 60 सदस्यांच्या सभागृहात युतीने 37 या संख्याबळावर स्पष्ट बहुमत मिळविले. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार वाय. मोहनबेमो हमत्सो यांनी रविवारीच आपण भाजप युती सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे 'पीटीआय'ला सांगितले होते. एनपीपीने 5, एलजेपी (रामविलास पासवान), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि आरपीआयने (रामदास आठवले गट) प्रत्येकी 2, जदयुने 1 आणि अपक्षांनी 4 जागा जिंकल्या आहेत.