राबडी देवींच्‍या निवासस्‍थानी सीबीआयची धडक, नोकर भरती प्रकरणी चौकशी? | पुढारी

राबडी देवींच्‍या निवासस्‍थानी सीबीआयची धडक, नोकर भरती प्रकरणी चौकशी?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी, बिहारच्‍या माजी मुख्‍यमंत्री राबडी देवी यांच्‍या पाटणा येथील निवासस्‍थानी आज ( दि. ६ ) केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय ) धडक दिली. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी सीबीआय पथकाने चौकशी केल्‍याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती संशयित आरोपी आहेत. सीबीआय पथक जेव्‍हा निवासस्‍थानी पोहचले तेव्‍हा राबडी देवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या. या वेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह मंत्री, लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव आणि राबडी देवींचे बंधू आणि विधान परिषद आमदार सुनील कुमार सिंह उपस्थित आहेत.

लालू प्रसाद यादव सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून गेल्या महिन्यातच भारतात परतले आहेत. दरम्‍यान, सीबीआय पथक राबडी देवी यांच्‍या निवासस्‍थानी आपल्‍याची माहिती मिळताच निवासस्थानाबाहेर आरजेडी समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. आरजेडी समर्थक केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

 

 

Back to top button