युद्ध आम्ही नव्हे, तर युक्रेनने सुरू केले; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दिल्लीत आरोप | पुढारी

युद्ध आम्ही नव्हे, तर युक्रेनने सुरू केले; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दिल्लीत आरोप

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  युक्रेन युद्धात आमच्याकडे आक्रमक म्हणून बोट दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात युक्रेनने युक्रेनी जनतेचा वापर करीत हे युद्ध सुरू केले आहे, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरॉव्ह यांनी केला आहे. दिल्लीत सुरू झालेल्या रायसीना परिषदेत ते बोलत होते.

लॅव्हरॉव्ह म्हणाले की, पाश्चिमात्य देश दुतोंडी आहेत. ते जी-20 परिषदेत युक्रेनवर चर्चा करतात; पण इराक, लिबिया, अफगाणिस्तान आणि युगोस्लाव्हियावर बोलायला त्यांची जीभ कचरते. युक्रेनच्या युद्धालाही हेच दुतोंडी पाश्चिमात्य देश जबाबदार आहेत. आम्ही युक्रेनचे युद्ध सुरू केलेले नाही. उलट युक्रेननेच आपल्या लोकांना भडकावत कुरापती काढत हे युद्ध सुरू केले आहे. उलट आम्ही हे युद्ध रोखण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही स्वसंरक्षणासाठी लढत आहोत. ते पुढे म्हणाले की, अमेरिका दुतोंडी आहे. त्यांना सर्बियावर केलेले क्रूर बॉम्बहल्ले आठवत नाहीत, इराकचा विध्वंस आठवत नाही. पण, युक्रेनबाबत मात्र अमेरिका हिरिरीने पुढे येते.

Back to top button