दुबईहून आलेल्या भाजी विक्रेत्याकडून हस्तगत केल्या सोन्याच्या 18 विटा | पुढारी

दुबईहून आलेल्या भाजी विक्रेत्याकडून हस्तगत केल्या सोन्याच्या 18 विटा

मोहाली, वृत्तसंस्था : दुबईहून विमानाने परतलेल्या एका भाजी विक्रेत्याकडून सीमाशुल्क विभागाने 10 कोटी 28 लाख रुपयांच्या सोन्याच्या 18 विटा जप्त केल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबच्या खन्ना शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या सूरज या तीसवर्षीय व्यक्तीच्या साहित्यात सोने असल्याची खबर मिळाल्यावर मोहालीच्या शहीद भगतसिंग विमानतळावर सापळा रचण्यात आला. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी एक किलो वजनाच्या सोन्याच्या 18 विटा आढळून आल्या. त्याला ताब्यात घेतले असून सीमाशुल्क विभागाच्या पथकाने त्याच्या खन्ना येथील घरावरही छापा टाकला. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे बँक पासबुक आणि काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.

दुबईहून मिळालेल्या माहितीनुसार तेथे साहित्याच्या तपासणीदरम्यान सुरजच्या बॅगेत सोने नव्हते. ते नंतर विमानतळावर ठेवले गेले. या विटांवर एतीहाद गोल्ड दुबई असे कोरण्यात आले आहे. दुबईहून सोन्याच्या तस्करीबाबत खबर मिळाल्यावर भारतात मोहालीत ही कारवाई करण्यात आली.

दिल्लीतही सोने पकडले

आंतरराष्ट्रीय उड्डाण करून परतल्यावर दोन देशांतर्गत उड्डाणे करणार्‍या एका विमानात दोन कोटी रुपयांचे सोने सीमाशुल्क विभागाने शनिवारी जप्त केले. हे सोने विमानाच्या टॉयलेट सीटच्या खाली चिकटपट्टीने चिकटवण्यात आले होते. चार हजार ग्रॅम वजनाच्या चार विटा असून त्याची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button