PM Modi: विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र; केंद्रीय तपास यंत्रणेच्या दुरुपयोगाचा उल्लेख | पुढारी

PM Modi: विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र; केंद्रीय तपास यंत्रणेच्या दुरुपयोगाचा उल्लेख

पुढारी ऑनलाईन: मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर न्यायालयाने तात्पुरती कोठडी सुनावली आहे. याविरुद्ध आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह नऊ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या होत असलेल्या दुरूपयोगाचा उल्लेख केला आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पीएम मोदी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत हा लोकशाही देश आहे हे तुम्ही मान्य करत असाल. विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ज्याप्रकारे कारवाई केली जात आहे, त्यावरून असे दिसते की, आपण लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहोत.

विरोधी पक्षाचे जे नेते भाजपमध्ये सामील होतात, त्यांच्याविरोधातील तपास आपोआप थंडावतो. राज्यपाल कार्यालयांकडून लोकनियुक्त सरकारांच्या कामकाजातील हस्तक्षेप वाढलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या दरम्यान दरी वाढण्यामागे राज्यपाल कारणीभूत ठरत आहेत, असे आरोप देखील या पत्रात करण्यात आले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनाही विरोधी नेत्यांनी लक्ष्य केले आहे.

पीएम मोदी यांना पत्र लिहलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये अरविंद केजरीवाल (आप), के. चंद्रशेखर राव (बीआरएस), ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), भगवंत मान (आप), तेजस्वी यादव (राजद), फारुख अब्दुल्ला (जेकेएनसी), शरद पवार (राष्ट्रवादी), उद्धव ठाकरे (शिवसेना-यूबीटी), अखिलेश यादव (एसपी) या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button