पुढारी ऑनलाई: राज्यात झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी पक्षासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडीवर आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा देखील विजय झाला आहे. तसेच त्यांचे दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागांवर त्यांना विजय मिळवता आला नाही.
नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीने बहुमत मिळवले आहे. एकूण 60 जागांपैकी या आघाडीने 37 जागांवर विजय मिळवला आहे. यापैकी 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे. नागालँडमध्ये बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एनडीपीपीला 32.33 टक्के मते मिळाली आहेत. तर, भाजपला 18 टक्के मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला 9.55 टक्के तर, काँग्रेसला 3.54 टक्के मते मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षालाही एका जागेवर विजय मिळाला. त्यांना 3.24 टक्के मते मिळाली.