त्रिपुरामध्‍ये पुन्‍हा कमळ फुलले! भाजप ३२ जागांवर विजयी | पुढारी

त्रिपुरामध्‍ये पुन्‍हा कमळ फुलले! भाजप ३२ जागांवर विजयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्‍हा एकदा बाजी मारली आहे. ६० पैकी ३२ जागांवर भाजपने विजय नोंदवला.   ६० जागांपैकी ३२ जागांवर भाजपने विजय नोंदवत बहुमत मिळवले आहे. माकपला ११ तर काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावे लागले. राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेली टिप्रा मोथा पक्ष लक्षणीय कामगिरी केली. या पक्षाने १३ जागा जिंकत सर्वांनी दखल घेण्‍यास भाग पाडले आहे. भाजपबरोबर आघाडी असणार्‍या इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा पक्षाला एका जागा मिळाली आहे. (Tripura Election 2023 )

भाजपची वाटचाल स्‍पष्‍ट बहुमताकडे

त्रिपुरामध्‍ये १६ फेब्रुवारी रोजी तब्‍बल ८६.१० टक्‍के मतदान झाले होते. राज्‍यात भाजप विरुद्‍ध माकप आणि काँग्रेस आघाडी असा सामना रंगला होता. तसेच नव्‍याने स्‍थापन झालेल्‍या टिप्रा मोथा पक्षानेही काही मतदारसंघांमध्‍ये प्रचार काळात आघाडी घेतल्‍याचे चित्र होते. आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासून भाजपने २८ मतदारसंघात निर्णायक आघाडी घेतली होती. दुपारी साडेबारानंतर राज्‍यात भाजप ३२ जागांवर आघाडीवर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. सायंकाळी पाचपर्यंत भाजपने ३२ मतदारसंघात विजय नोंदवला.  दरम्‍यान,
त्रिपुराचे मुख्‍यमंत्री माणिका साहा यांनी पश्‍चिम त्रिपुरातील नगर बरदोवाली मतदारसंघातून बाजी मारली आहे. राजधानी आगरतळा येथील त्रिपुराचे मुख्‍यमंत्री मणिक साहा यांच्‍या निवासस्‍थानी दुपारपासूनच मिठाईचे वितरण करण्‍यास सुरुवात झाली.

Tripura Election 2023 : चर्चा टिप्रा मोथा पक्षाची

त्रिपुरा विधानसभा निवडणूक प्रथमच लढविणार्‍या टिप्रा मोथा पक्षाने १२ मतदारसंघात विजय मिळवला आहे. अवघ्‍या दोन वर्षांपूर्वी स्‍थापन झालेला हा पक्ष यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला होता. त्रिपुराच्या राजघराण्‍यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्‍यांची ओळख झाली आहे. यंदाच्‍या विधानसभेत हा पक्ष काँग्रेस-डावे आघाडीला जोरदार टक्‍कर देताना दिसला. विशेष म्‍हणजे देववर्मा हे स्‍वत: निवडणूक रिंगणात नाहीत. मात्र पक्ष प्रमुख म्‍हणून त्‍यांची भूमिका त्रिपुराच्‍या राजकारणात लक्षणीय ठरली आहे.

त्रिपुराच्या राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा हे पूर्वश्रमीचे काँग्रेचे नेते. २५ फेब्रुवारी २०१९ मध्‍ये त्‍यांची त्रिपुरा काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदी नियुक्‍तीही झाली होती. मात्र काही महिन्‍यांमध्‍ये त्‍यांनी काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींवर भ्रष्‍ट लोकांना प्रोत्‍साहन देत असल्‍याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्‍यांनी स्‍वत:च्‍या पक्षाची स्‍थापन केली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button