

पुढारी ऑनलाईन डेस्क : जानेवारी महिन्याच्या अखेरीस उत्तर भारतात उष्णता जाणवू लागली आहे. २०२२ फेब्रुवारीमधील उष्णतेने १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. या दरम्यान दिवसाचे सरासरी तापमान १.७३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. यापूर्वी, १९०१ मध्ये फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमान ०.८१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याचबरोबर येत्या ३ महिन्यात उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 1 मार्चपासून, हवामान विभाग संपूर्ण देशासाठी उष्णतेच्या लाटेसाठी कलर-कोडेड (color coded) इशारे जारी करेल.
येत्या तीन महिन्यात भारतात उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशातील अनेक भागांमध्ये दिसून येईल, विशेषत: दक्षिण भारत, मध्य भारतातील काही भाग, पश्चिम भारत आणि उत्तर भारतात. याशिवाय मार्चमध्ये देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, येत्या 3 महिन्यात दिवसा कडक उष्मा असेल. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात कडक उन्हाची शक्यता आहे. तर गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते आणि रात्रीचे तापमान जास्त राहील.
भारत हा हवामान बदलाबाबत अत्यंत संवेदनशील देशांपैकी एक देश आहे. उष्णतेच्या लाटा, भीषण पूर आणि दुष्काळ यासारख्या अधिक तीव्र हवामानाच्या घटना दरवर्षी हजारो लोकांचा बळी घेतात. अशा हवामानामुळे विविध क्षेत्रावर परिणाम होत असतो.