Bombay High Court: लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे लैंगिक छळ नाही | पुढारी

Bombay High Court: लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे लैंगिक छळ नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर एखाद्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा तुमचा हेतू नसेल आणि तिचा हात धरून तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले असेल तर तो लैंगिक छळ नाही. असाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेम व्यक्त करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सुनावणीदरम्यान एकल न्यायाधीश भारती डांगरे, ‘आरोपी धनराजचा मुलीसोबत कोणताही लैंगिक हेतू नव्हता. त्याने मुलीचा विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला नाही. तो फक्त मुलीवर प्रेम व्यक्त करत होता. या बाबतीत त्याचा हेतू वाईट नव्हता,’ असे म्हटले.

उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात म्हटले होते की, ‘आरोपांची पडताळणी केल्यानंतर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही. क्षणभर समजू या की, रिक्षाचालकाने त्या अल्पवयीन मुलावर प्रेम व्यक्त केले होते, परंतु त्या अल्पवयीन मुलीच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, रिक्षाचालकाचा कोणताही लैंगिक अत्याचाराचा हेतू नव्हता.’

पीडितेच्या वडिलांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल केलेल्या एफआयआरमधून हे प्रकरण उघडकीस आले होते. आरोपी धनराज बाबुसिंद राठोड याने आपल्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप वडिलांनी पोलिस तक्रारीत केला आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपली अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना ओळखत होता कारण तो त्यांच्या शेजारी राहत होता. तो रिक्षा चालवायचा. मुलगी अनेकदा शाळेत आणि शिकवणीला जाण्यासाठी धनराजच्या रिक्षातून प्रवास करायची. मात्र, मुलीने रिक्षातून जाणे बंद केल्यानंतर एक दिवस घटनेच्या दिवशी धनराजने मुलीला थांबवून जबरदस्तीने रिक्षात बसवले, मात्र मुलीने नकार दिला. यानंतर धनराजने मुलीचा हात धरून तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आणि रिक्षात बसण्याचा हट्ट करू लागला.’

मात्र, मुलीने घटनास्थळावरून पळ काढला आणि संपूर्ण घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी धनराजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपशील विचारात घेऊन न्यायमूर्ती डांगरे यांनी याचिकाकर्त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. भविष्यात अशा कृत्यांपासून दूर राहण्याचा इशाराही आरोपीला दिला. याप्रकरणी तक्रार आल्यास अटकपूर्व जामीन रद्द होईल.

Back to top button