

रायपूर, वृत्तसंस्था : माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी संजीवनी ठरलेल्या भारत जोडो यात्रेने झाला, याचे मला अधिक समाधान आहे, या विधानानंतर सोनिया गांधी यांच्या राजकीय निवृत्तीवरून सुरू झालेल्या चर्चेला विराम देत काँग्रेसने सोनिया गांधी निवृत्त झाल्या नाहीत व निवृत्त होणारही नाहीत, असा खुलासा केला आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनात शनिवारी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या भारत जोडो यात्रेने माझ्या प्रवासाचा समारोप झाला, याचे आपल्याला अतीव समाधान आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर आज काँग्रेसच्या वतीने खुलासा केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी व्यासपीठावरूनच सांगितले की, सोनिया गांधी यांनीच स्पष्ट केले आहे की, त्या निवृत्त होणार नाहीत. त्या आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. सोनिया गांधी निवृत्त झाल्या नाहीत, निवृत्त होणारही नाहीत. माध्यमांनी सोनिया गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करू नये.
काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या खुलाशानंतर समोर प्रेक्षकांत बसलेल्या सोनिया गांधी मिश्कीलपणे हसत होत्या.