बेरोजगारीचा दर पाच वर्षांत सर्वांत नीचांकी; लोकसंख्येच्या तुलनेत रोजगाराचे प्रमाण वाढले | पुढारी

बेरोजगारीचा दर पाच वर्षांत सर्वांत नीचांकी; लोकसंख्येच्या तुलनेत रोजगाराचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशाची अर्थव्यवस्था योग्य गतीने व योग्य दिशेने जात असल्याने गेल्या पाच वर्षांत प्रथमच 2021-22 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर सर्वात कमी म्हणजे 4.1 टक्के राहिला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या नियमित मनुष्यबळ सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

मनुष्यबळ सर्वेक्षणासाठी जुलै 2021 ते जून 2022 हा कालावधी निवडण्यात आला आहे. संदर्भासाठी 2020-21 आणि 2019-20 या वर्षांसाठीही हाच कालावधी निवडण्यात आला. 2019-20 मध्ये बेरोजगारीचा दर 4.8 टक्के होता तर त्याच्याच पुढल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये तो 4.2 पर्यंत तो खाली आला होता. त्यातही आणखी घसरण होऊन 2021-22 मध्ये तो पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 4.1 टक्के झाला.

मनुष्यबळ सर्वेक्षणाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, वय 15 व पुढील गटातील बेरोजगारीचा हा दर आहे. पुरुषांमधील बेरोजगारीचा दर 2021-22 मध्ये 4.4 टक्क्यांवर आला. तो 2020-21 मध्ये 4.5 टक्के होता. त्या आधीच्या वर्षी तो 5 टक्के होता. याच काळात महिलांमधील बेरोजगारीचा दरही लक्षणीयरित्या घटला आहे. 2019-20 मध्ये 4.2 टक्के असणारा दर 2020-21 मध्ये 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आला तर 2021-22 मध्ये तो आणखी खाली येत 3.3 टक्के एवढा नोंदवला गेला.

लोकसंख्येच्या तुलनेत रोजगाराचे प्रमाण वाढले

लोकसंख्येच्या तुलनेतील रोजगाराचे प्रमाण वाढले आहे. 2019-20 मध्ये हे प्रमाण 50.9 टक्के होते ते 2021-22 मध्ये 52.6 टक्के इतके वाढले तर 2021-22 मध्ये 52.9 टक्के एवढा पल्ला गाठला. महिलांचे लोकसंख्येच्या तुलनेतील रोजगाराचे प्रमाणही चांगल्या प्रकारे सुधारले आहे. ते 2021-22 मध्ये 31.4 टक्के होते, 2021-22 मध्ये ते वाढून 31.7 टक्के झाले. पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 2021-22 मध्ये 73.5 टक्के असलेले हे प्रमाण 2021-22 मध्ये 73.8 टक्क्यांवर पोहोचले.

Back to top button