माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा राजकारणाला भावुक रामराम | पुढारी

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा राजकारणाला भावुक रामराम

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  हे माझे शेवटचे अधिवेशन आहे. यापुढे मी आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करणार नाही, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. पक्ष संघटनेसाठी सक्रिय असणार असून राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ते भावुक झाले होते.

येडियुराप्पा म्हणाले, पुढील विधानसभा निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे पुन्हा सभागृहात येणार नाही. मात्र राज्यभरात दौरे करून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आणू. पक्षाच्या वरिष्ठांकडून मला कधीही दुजाभाव दाखविण्यात आलेला नाही. मला नेहमीच आदराचे स्थान देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाने मला संधी दिल्यानेच चारवेळा मुख्यमंत्री झालो. पक्षाने मला जशी संधी दिली, तशी संधी आणखी कोणालाही दिलेली नाही. येडि पुढे म्हणाले, निवडणूक लढवणार नाही, म्हणजे येडियुरप्पा गप्प बसणार नाही. राज्यभरात दौरा करणार आहे. पक्षाला सत्तेवर आणणार. राज्यात भाजपचे वारे आहे. हे विरोधी पक्षाला दिसत आहे. काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्षाच्या बाकावरच बसावे लागणार आहे. हे शंभर टक्के सत्य आहे.

काँग्रेस नेते प्रियांक खर्गे, निजदचे शिवलिंगेगौड यांच्यासह अनेक सदस्यांनी सभागृहात उभे राहून येडिंना तुम्हाला पुन्हा निवडणुकीला उभे राहावे लागणार असे सांगितले. पण त्याकडे लक्ष न देता येडियुरप्पा म्हणाले, यिंदा केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांना सर्व योजना पुरवणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश अधिक बळकट झाला आहेे, असेही येडि म्हणाले.

Back to top button