भारताच्या सीमेवर भयंकर षड्यंत्र; चीनच्या सेनेत पाकचे लष्करी अधिकारी तैनात | पुढारी

भारताच्या सीमेवर भयंकर षड्यंत्र; चीनच्या सेनेत पाकचे लष्करी अधिकारी तैनात

बीजिंग/इस्लामाबाद : वृत्तसंस्था

कुरापतखोर चीन आणि पाकिस्तान या दोन देशांनी भारताच्या सीमेवर मोठे षड्यंत्र रचले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (लाल सेना) पश्चिम आणि दक्षिण कमांडमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकारी तैनात करण्यात आल्याचे खळबळजनक वृत्त आहे. चिनी सैन्याची पश्चिम कमांड लडाखमध्ये, तर दक्षिण कमांड तिबेटच्या भागांत तैनात आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि लष्कर या सगळ्या घडामोडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे.

न्यूज 18 ने हे खळबळजनक वृत्त दिले असून गोपनीय अहवालाच्या हवाल्याने चीन आणि पाकिस्तानच्या या कारस्थानांची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांना या दोन्ही मोक्याच्या जागांवर कमांडच्या मुख्यालयांत नियुक्ती दिली आहे. चिनी लष्कर या पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या पुढ्यात नोटांची बंडले फेकत आहेत. चीनकडून गेल्या महिन्यात जनरल वांग हेजियांग यांना पश्चिम कमांडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, जवळपास 10 पाकिस्तानी लष्करी अधिकारी बीजिंगमधील दूतावासात तैनात आहेत. त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी आहे.

कॉरिडॉरसाठी वेगळी संयुक्त फौज

पाकिस्तानातील दैनिक ‘द डॉन’ने 2016 मध्ये एक वृत्त प्रकाशित केले होते. त्यात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी एकूण 15 हजार सैनिकांचे युनिट तैनात करण्यात आले होते. प्रत्येक द्विपक्षीय चर्चेत, एकीकडे चीन पूर्व लडाख व अन्य भागांतून सैनिकांच्या माघारीच्या वल्गना करतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही तणाव संपुष्टात आणण्याची भाषा करतो आणि प्रत्यक्षात भारताच्या सीमेवर मात्र चीनचे विस्तारवादी धोरण सुरूच आहे. मागील महिन्यातही चिनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये भारतीय सीमेत दाखल होऊन भारतीय हद्दीतील पूल पाडून टाकला. थोडक्यात गलवान खोर्‍यातील हिंसक धुमश्चक्रीनंतरही चीनची खुमखुमी गेलेली नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनीही गुरुवारीच, बोलणे आणि वागणे असे टोकाचे वेगळे असेल तर शांतता नांदायची कशी, अशी खंत चीनबाबत व्यक्त केली होती.

लडाखमध्येच एकीकडे सैनिकांची माघार घ्यायची आणि नंतर याच भागात अन्य कुठेतरी सैनिकांची जमवाजमव करायची, असे उपद्व्याप चीनकडून सतत सुरू आहेत.

दक्षिण कमांडच्या कक्षेत तिबेटव्यतिरिक्त हाँगकाँग आणि मकाऊ या (विशेष प्रशासकीय प्रदेश) भागांचीही जबाबदारी आहे. पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही कमांडमध्ये पाकिस्तानातील कर्नल दर्जाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. लढाईची योजना, प्रशिक्षण आणि धोरण अशी तिहेरी जबाबदारी या पाकिस्तानी अधिकार्‍यांना चीनकडून देण्यात आली आहे.

चीन-पाककडून स्कर्दू हवाईतळाचा विस्तार; सॅटेलाईट छायाचित्रातून षड्यंत्राचा पर्दाफाश

इस्लामाबाद : चीनच्या नियंत्रण रेषेवर (एलएसी) कुरापती सुरू असताना पाकिस्तानकडून श्रीनगरपासून 155 कि.मी. अंतरावर असलेल्या स्कर्दू विमानतळाचा विस्तार करून नवी धावपट्टी निर्माण केली जात आहे. या एअरबेसवर पाकने जेएफ 17 लढाऊ विमानांचे स्क्वाड्रन तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. सॅटेलाईट छायाचित्रामधून पाकचा हा नापाक कट उघडकीस आला आहे. स्कर्दू एअरबेसच्या दुसर्‍या धावपट्टीचे काम पूर्ण होत आले आहे. स्कर्दू एअरबेस ऑपरेशनमध्ये पाक आणि चीनचे हवाई दल संयुक्तरीत्या मोहीम आखत आहेत. या एअरबेसवर अनेक चिनी विमानेही दिसल्याची माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या स्कर्दूमध्ये म्हणजेच ‘पीओके’मध्ये असलेल्या पाकच्या हवाई दलाच्या या हवाई तळाला मोठे सामरिक महत्त्व आहे. येथून श्रीनगर आणि लेहचे अंतर फक्त 200 किलोमीटर आहे. येथून उड्डाण केल्यानंतर, पाकिस्तानी लढाऊ विमाने अवघ्या 5 मिनिटांत भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकतात. यामुळे चीन आणि पाककडून विमानांसाठी नवी धावपट्टी तयार केली जात आहे.

Back to top button