महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड | पुढारी

महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून विजेत्या १३ खासदारांत महाराष्ट्रातील लोकसभा खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान या चार खासदारांचा समावेश आहे.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये १३ खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या सहअध्यक्षतेखालील निवड समितीकडून संसदरत्न विजेत्यांची निवड करण्यात आली. लोकसभेतील आठ खासदार लोकसभा खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, भाजपचे डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजप खासदार हिना विजयकुमार गावित, भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपचे सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्यसभेतून पाच जणांची निवड

राज्यसभा खासदारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. जॉन ब्रिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, समाजवादी पक्षाचे विशंभर प्रसाद निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Back to top button