२ मुलांची आई पडली आपल्याच नंणदेच्या प्रेमात; दोघींनी केले लग्न | पुढारी

२ मुलांची आई पडली आपल्याच नंणदेच्या प्रेमात; दोघींनी केले लग्न

पाटणा, वृत्तसंस्था : बिहारच्या समस्तीपूरच्या ढरहरा गावात २ मुलांची आई तिच्याच नणंदेच्या प्रेमात पडली. दोघींनी लग्नही केले. माझी पत्नी माझ्याच बहिणीशी लग्न करते आहे म्हणून पतीने या लग्नात कुठलेही विघ्न आणले नाही. पुन्हा तिघे एकाच घरात राहात होते. मोठ्या नणंदेला कुणकूण लागल्यानंतर तिने धाकट्या बहिणीला सोबत नेले. विरहव्याकूळ २ मुलांच्या या आईने मग थेट पोलिस ठाणे गाठले. आता काय करावे म्हणून पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत.

समस्तीपूरच्या रोसडा पोलिस ठाण्यात फिर्यादीचे एकूण रूप पाहून महिला एएसआय आधी तिला मुलगा समजली, पण नंतर हकीकत कळली तेव्हा या एएसआयचीही भंबेरी उडाली. प्रकरण एकुणात असे : सुकला देवीचा विवाह २०१३ मध्ये ढरहरा येथील प्रमोद यांच्याशी झाला होता. त्यांना २ मुले आहेत. पुढे सुकलादेवी ही पती प्रमोदची धाकटी बहीण सोनी (१८) हिच्या प्रेमात पडली. दोघींचे प्रेम बहरत गेले.

पाच महिन्यांपूर्वी या दोघींनी एकमेकींशी लग्न केले. प्रमोद यांनी कुठलीही हरकत घेतली नाही. सुकला व सोनी या दोघीही प्रमोद यांच्यासोबतच एकाच घरात राहात होत्या. कुणकूण लागताच सोनीची मोठी बहीण उषादेवी या दहा-पंधरा जणांसह ढरहरा गावात आल्या आणि सोनीला सोबत घेऊन निघून गेल्या.. आम्ही सुकला हिची तक्रार दाखल करून घेतली आहे. तपास सुरू आहे, असे रोसडा पोलिस ठाण्याचे अधिकारी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले.

Back to top button