एक ग्राहक दरमहा वापरतो 19.5 जीबी डेटा | पुढारी

एक ग्राहक दरमहा वापरतो 19.5 जीबी डेटा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  देशात इंटरनेटचा वापर कमालीचा वाढला असून 2022 मध्ये देशवासीयांनी एकूण 14.4 एक्झाबाईटस् डेटा वापरला, असा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला आहे. यावरून प्रत्येक मोबाईलधारक महिन्याकाठी सरासरी 19.5 जीबी डेटा वापरतो, असा निष्कर्ष निघला आहे.

गेल्या पाच वर्षांत डेटाचा वापर देशात 3.2 पटींनी वाढला आहे. 2018 मध्ये तो 4.5 एक्झाबाईट होता, असे नोकियाच्या ममोबाईल ब्रॉडबँड इंडेक्स (एम्बिट) या वार्षिक अहवालात म्हटले आहे. सध्या इंटरनेटचा 100 टक्के वापर देशातील फोर जी आणि फाईव्ह जी ग्राहकच करीत आहेत. फोर जी एलटीई प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर भारतातील इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला. आता फाईव्ह जी सेवा सुरू झाल्यानंतर तो कित्येक पटींनी वाढणार असून, याचा फायदा ग्राहक आणि कंपन्यांनाही होईल, असे नोकियाच्या भारतातील शाखेचे प्रमुख संजय मलिक यांनी सांगितले. 2024 मध्ये देशातील डेटाचा वापर दुपटीपेक्षा जास्त होईल, असेही ते म्हणाले.

250 दशलक्ष डॉलर्सपर्यंत गुंतवणूक

2022 मध्ये 70 दशलक्षहून अदिक फाईव्ह जी मोबाईल हँडसेट भारतात दाखल झाले आहेत. यावरून या बाजारपेठेची वाढ लक्षात येते. या वाढीचा उपयोग उत्पादन, सेवा, वाहतूक आणि आरोग्यसेवा देणार्‍या कंपन्यांना होईल, असे या अहवालात म्हटले आहे. 2027 पर्यंत देशाची खासगी बिनतारी क्षेत्रातील गुंतवणूक 250 दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशाला ट्रिलियन डॉलर आर्थिक सत्ता बनविण्यास ही प्रगती निश्चितच हातभार लावेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

Back to top button