पुढारी ऑनलाईन डेस्क : मुरादाबादच्या एमपी-एमएलए विशेष न्यायालयाने छजलैट प्रकरणात समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आझम खान आणि त्यांचा मुलगा आमदार अब्दुल्ला आझम खान यांना दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने आझम खान आणि त्यांच्या मुलाला 2-2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली.
29 जानेवारी 2008 रोजी छजलैट पोलिसांनी आझम खान यांची गाडी तपासणीसाठी अडवली, त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याप्रकरणी अब्दुल्लांसह नऊ जणांना पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि जमावाला भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आझम खान आणि अब्दुल्ला खान यांच्यासह सपाच्या 9 नेत्यांना दोषी ठरवण्यात आले. सोमवारी (दि.१३) न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांना दोषी ठरवले. तर उर्वरितांना निर्दोष घोषित करण्यात आले आहे.