हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानींचे मोठे पाऊल; ऑडिटसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीची निवड | पुढारी

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानींचे मोठे पाऊल; ऑडिटसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीची निवड

पुढारी ऑनलाईन : हिंडेनबर्ग वादानंतर अडचणीत सापडलेल्या गौतम अदानी यांनी आपल्या ग्रुपच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलेले आहे. अदानी यांनी आपल्या काही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यासाठी अकाऊंटंसी ग्रँट थॉर्नटन या आंतरराष्ट्रीय कंपनीची निवड केली आहे. हिंडनबर्ग वादानंतर आपल्या बचावासाठी अदानी समूहाने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल आहे.

शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सपासून बॉन्डपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारी भांडवलात मोठी घट होऊन, ते निम्म्यावर आले आहे. न्यूज एजन्सी रायटर्सनुसार, हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूह कायदेशीर नियम, संबंधित पक्षातील घेवाणदेवाण आणि अंतर्गत निर्बंधाशी संबंधित मुद्द्यावर वेगवेगळ्याप्रकारे अभ्यास करत आहे. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, समूहातील काही कंपन्यांच्या ऑडिटसाठी ग्रँट थॉर्नटन या आंतरराष्ट्रीय कंपनीला नियुक्त केले आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अदानी समूहावर अफरातफर, फसवणूक यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर अदानी समूहाने या आरोपांना चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांत अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारी भांडवलात १२० अब्ज डॉलरचे नुकसान पोहचल्याचेही रायटर्सने म्हटले आहे.

ग्रँट थॉर्नटन जगातील सातवे सर्वात मोठे अकाउंटिंग नेटवर्क

ग्रँट थॉर्नटन ही आर्थिक सल्ला, ऑडिट आणि सल्लागार सेवा देणारी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ग्रँट थॉर्नटन एलएलपी ही ग्रँट थॉर्नटन इंटरनॅशनलची अमेरिकन सदस्य फर्म आहे. या कंपनीच्या एकत्रित शुल्क उत्पन्नाद्वारे जगातील सातवे सर्वात मोठे अकाउंटिंग नेटवर्क आहे. ग्रँट थॉर्नटन एलएलपी ही अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची लेखा आणि सल्लागार संस्था आहे.

हेही वाचा:

Back to top button