

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशियाकडून शस्त्रास्त्रे (संरक्षण साहित्य) आयात करण्यात भारत जगात पहिल्या स्थानी असल्याचा दावा रशियाच्या सरकारी न्यूज एजन्सीने केला आहे. पाश्चिमात्य देशांचा दबाव असतानाही तो झुगारून भारताने रशियाकडून संरक्षण साहित्य आयात केले हे विशेष!
गेल्या पाच वर्षांत रशियाने सुमारे 13 बिलियन डॉलर म्हणजे 1 लाख कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांचा भारताला पुरवठा केला आहे. याचदरम्यान भारताने रशियाकडे 10 बिलियन डॉलरचे संरक्षण साहित्य मागितले होते. रशियाकडून 20 टक्के हत्यारे एकट्या भारताकडून आयात केली जातात. युक्रेनबरोबर युद्ध सुरू असतानाही दोन्ही देशांच्या संरक्षण साहित्य खरेदीवर काहीच परिणाम झाला नसल्याचे न्यूज एजन्सीने म्हटले आहे. रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल कॉपारेशनचे प्रमुख डिमिट्री शुगायेव्ह यांनी सांगितले की, भारताशिवाय चीन आणि दक्षिण-पूर्वी आशियाई देशांतून रशियाच्या हत्यारांचा आयात केली जाते. रशियाकडून शस्त्रे खरेदी करू नये, यासाठी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी भारतावर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र हा दबाव भारताने झुगारून टाकला. त्यामुळे रशिया आणि भारताचे संबंध आणखीनच द़ृढ झाले आहेत.