

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यातील एका परप्रांतीय मजुरांच्या दोन झोपड्यांना आग लागली. या आगीत चार मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सोनू कुमार (वय १४) नीतू कुमारी (१४) भोलू कुमार (७) आणि शिवम कुमार (६) यांचा समावेश आहे. हे सर्व बिहार राज्यातील दरभंगा येथील रहिवासी आहेत. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तत्काळ मदत दिली आहे. वाचा सविस्तर माहिती.(Himachal Pradesh)
माहितीनूसार, हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यातील आंब पोलीस स्टेशन अंतर्गत बने दी हत्ती येथील भागात दोन झोपडपट्यांना आग लागली. या दोन्ही झोपडपट्यांमध्ये बिहारमधील लोक राहत होते. या भीषण आगीत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चार मुलांपैकी नीतू कुमारी (१४) भोलू कुमार (७) आणि शिवम कुमार (६) हे एकाच कुटूंबातील आहेत. तर सोनू कुमार (वय १४) हा त्यांच्या नातलगांमधील आहे. ही चारही मुले रात्रीच्या सुमारास एका झोपडपट्टीमध्ये अभ्यासानिमीत्त एकत्र होते. तर दुसऱ्या झोपडपट्टीत घरातील इतर सदस्य होते.
वेळूच्या झोपडीत आग इतकी वेगाने पसरली की मुलांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दल आंब येथील अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आग विझवली, मात्र तोपर्यंत चार मुलांचा मृत्यू झाला होता. सोनू कुमार हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
आगीचे कारण समजू शकले नाही. मृतामधील शिवम, नीतू आणि भोलू कुमार हे भाऊ-बहिणी आहेत. सोनू हा त्यांचा मामेभाऊ आहे. सोनूचे आई-वडील काही कामानिमित्त दरभंगाला गेले असल्याने तो त्याच्या नातलगांकडे वास्तव्याला आलेला. मृतांचे आई-वडील बने दी हत्तीमध्ये जवळपास २५ वर्षांपासून झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या कुटुंबाकडे दोन झोपडपट्ट्या आहेत.
हेही वाचा