पॅरिस / नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी उद्योग समूहाला उतरती कळा लागल्यानंतर फ्रान्सच्या टोटल एनर्जीनेही अदानी समूहाला दणका दिला आहे. टोटल एनर्जीने अदानी समूहासोबतच्या पाच हजार कोटी डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पातील गुंतवणूक तूर्तास रोखली आहे. हा अदानी यांना मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी जीएसटी प्रकरणात अदानी विल्मरवर छापा टाकला.
फ्रान्सच्या टोटल एनर्जी या ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने अदानी समूहाबरोबर केलेली भागीदारी तूर्तास स्थगित केली आहे. त्यांच्या पाच हजार कोटी डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पात या कंपनीची सर्वांत मोठी परदेश गुंतवणूक आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांबाबत स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नसल्याचे टोटल एनर्जीजने म्हटले आहे. अदानी समूहाला या निर्णयामुळे आणखी एक फटका बसला आहे
मागच्या वर्षी जूनमध्ये टोटल एनर्जीजने या समूहाबरोबर भागीदारी जाहीर केली होती. फ्रान्सीस समूहाचे मुख्य कार्यपालक पॅट्रिक पॉयन यांनी यासंंबंधात सांगितले,
आम्ही भागीदारी जाहीर केली होती तरी आतापर्यंत करारावर स्वाक्षर्या झाल्या नव्हत्या. आधी झालेल्या घोषणेनुसार टोटल एनर्जीजने अदानी समूहाची कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) सोबत 25 टक्के भागीदारी घेणे अपेक्षित होते. हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी कंपनी पुढील दहा वर्षांसाठी 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. 2030 च्या आधी एक अब्ज टन क्षमतेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
अदानी विल्मरवर छापा
हिमाचल प्रदेशाच्या सोलन जिल्ह्यातील अदानी विल्मरच्या युनिटवर तेथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जीएसटी प्रकरणी छापा टाकला. यात अधिकार्यांनी कंपनीच्या कॅरिंग आणि फॉरवर्ड युनिटची पाहणी केली. कंपनी अनेक वर्षांपासून वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) रक्कम जमा करू शकली नसल्याने ही तपासणी करण्यात आली. या अधिकार्यांनी कंपनीचे खाते आणि तेथील माल तपासला. त्याचा अहवाल तयार केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
दुसरीकडे, या छाप्यानंतर अदानी विल्मरच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात हिमाचलच्या जीएसटी विभागाच्या अधिकार्यांना काहीही गैरप्रकार आढळले नसून कंपनी जीएसटीचे काहीही देणे लागत नाही. हा छापा नसून नेहमीची तपासणी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे सर्व व्यवहार कायदा व नियमानुसारच असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे गौतम अदानी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच केला होता. त्यानंतर काही दिवसांनी ही बाब समोर आली आहे. सध्या, अदानी समूहाच्या रिटेल शाखेचा ट्रक ऑपरेटर्सबरोबर तंटा सुरू आहे. वाहतूकदारांनी मालवाहतुकीचे दर वाढवल्यानंतर कंपनीने दोन सिमेंट प्रकल्प बंद केले होते.
शेअर स्टेटस्चे परीक्षण करणार
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये होणार्या चढउतारांच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल इन्व्हेस्टेबिल मार्केट इंडेक्स मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल (एमएससीआय) अदानी समूहाच्या फ्री फ्लोटचे परीक्षण करणार आहे. या बातमीने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 15 टक्के घट झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानींच्या समूहासमोरील आव्हाने थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच एमएससीआयने अदानी समूहाच्या फ्री फ्लोटचे परीक्षण करण्याचे ठरविले आहे. एमएससीआयच्या म्हणण्यानुसार, अदानी समूहाच्या सिक्युरिटीजच्या काही गुंतवणूकदारांना आता फ्री फ्लोट करता येणार नाही. अदानी समूहाशी संलग्न सिक्युरिटीजची योग्यता आणि फ्री फ्लोट निश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक भागधारकांकडून फिडबॅक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शेअर्स घसरले
अदानी समूहातील कंपन्यांच्या सिक्युरिटीजच्या फ्री फ्लोट स्टेटस्बद्दल जाहीरपणे चिंता व्यक्त करण्यात आली होती. या वृत्तानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. अदानी एंटरप्राईजेसचा शेअर तब्बल 15 टक्क्यांनी खाली आला.
अदानी पोर्टस्च्या शेअर्समध्ये 3.54 टक्के घसरण झाली, तर अदानी पॉवरच्या, अदानी ट्रान्समिशनच्या आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागले. अदानी ग्रीनचे शेअर्स 3.78 टक्क्यांपर्यंत घसरले. मात्र अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये 3.61 टक्के वाढ झाली आहे.
एमएससीआयने अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर हेराफेरीचा आरोप करणार्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाच्या अनुषंगाने समूहाच्या सिक्युरिटीजसंदर्भात माहिती मागितली आहे. एमएससीआयच्या या घोषणेनंतर हिंडेनबर्गचे संस्थापक नाथन अंडरसन म्हणाले की, एमएससीआयच्या अदानी समुहातील या शेअर स्टेटस् परीक्षणाच्या निर्णयामुळे हिंडेनबर्गच्या अहवालाला अधिक पाठबळ मिळाले आहे.
नॉर्वे वेल्थ फंडने 20 कोटी डॉलर्सचे शेअर्स विकले
फ्रान्सच्या 'टोटल एनर्जी'ने अदानी समूहातील आपली गुंतवणूक तूर्त रोखल्यानंतर आता नॉर्वे वेल्थ फंड या मोठ्या गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे 20 कोटी डॉलर्सचे शेअर्स विकून टाकले आहेत. नॉर्वेच्या सरकारचे पाठबळ असलेला हा स्वायत्त फंड असून जगभरातील निवडक कंपन्यांत त्यांच्याकडून गुंतवणूक केली जाते. त्यांनी अदानी टोटल गॅसमध्ये 8 कोटी 36 लाख डॉलर्स, अदानी पोर्टस्मध्ये 6 कोटी 34 लाख डॉलर्स आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीत 5 कोटी 27 लाख डॉलर्सची शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. जवळपास 20 कोटी डॉलर्सची गुंतवणूक नॉर्वे वेल्थ फंडाने काढून घेतली आहे.