PM Modi: नकारात्मक मानसिकेतूनच विरोधकांचे निराधार आरोप: पंतप्रधान मोदी | पुढारी

PM Modi: नकारात्मक मानसिकेतूनच विरोधकांचे निराधार आरोप: पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत काही जणांच्या भाषणावर समर्थक उड्या मारत होते, काही जण भाषणानंतर खूश झाले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर अप्रत्यक्षपणे केली. काही जणांच्या भाषणातून क्षमता, योग्यता समजते, असा टोलाही मोदी यांनी गांधी यांना लगावला. पंतप्रधान मोदी आज (दि.८) लोकसभेत बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या आरोपांना पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लोकसभेत प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, देश भ्रष्टाचारातून मुक्त होत आहे, त्यामुळे जनतेचा आत्मविश्वास वाढला आहे. काही देशात भीषण अन्नटंचाई, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. आपल्या आजुबाजूचे देश आर्थिक संकटात आहेत. परंतु, या परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, ही देशातील १४० कोटी जनतेसाठी गौरवाची बाब आहे. परंतु या गोष्टींचे काही लोकांना दु:ख होत आहे, नैराश्य आलेल्या लोकांना विकास दिसत नाही. हे लोक तुम्हीच ओळखा.

भारतातील स्थिरता पाहून इतर देश मोठ्या आशेने पाहत आहेत. काळानुसार गरजेचे आहे ते देशासाठी करत राहणार आहे. डिजिटल इंडियाची चोहोबाजूंने वाहवा होत आहे. कोरोना काळात भारताने मोठे लसीकरण राबवले. करोडो लोकांना मोफत लस देण्यात आली. तंत्रज्ञानाच्याबाबतीत भारताने मोठी आघाडी घेतली आहे. जलद विकास भारताची ओळख बनू लागली आहे. ९० हजार स्टार्टअप सुरू केले आहेत. याबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोबाईल उत्पादनात भारत जगात दुसरा देश बनला आहे.

PM Modi : देशातील काही लोक निराशेत पूर्णपणे बुडाले

भारताला जी -२० अध्यक्षपद मिळणे मानाची गोष्ट आहे. २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था खालावली होती. मागील दहा वर्षात महागाईचा दर १० अंकी राहिला आहे. पण देशातील काही लोक निराशेत पूर्णपणे बुडाले आहेत. त्यामुळे त्यांना देशाची प्रगती दिसत नाही, असा टोला मोदी यांनी राहुल गांधी यांना यावेळी लगावला. २००४ ते २०१४ या काळात विरोधकांना देशाची क्षमता आणि सामर्थ्य दाखविण्याची संधी होती. परंतु ही संधी त्यांनी गमावली. युपीए २ जी आणि कॉमनवेल्थ मध्येच अडकून पडली. २०१४ पर्यंत देशात अनेक घोटाळे झाले. दहशतवादी हल्ल्यामुळे देश असुरक्षित होता. दहशतवाद्यांना आव्हान देण्याची ताकद युपीए सरकारमध्ये नव्हती. परंतु आता देशाची क्षमता आणि देशवासियांचे सामर्थ्य वाढले आहे, असे मोदी यांनी सांगितले.

२०१४ पर्यंत देश लॉस्ट डिकेड होता. ईडीमुळे देशातील विरोधक एकत्र आले आहेत. यासाठी त्यांनी ईडीचे आभार मानले पाहिजेत. ‘तुम्हारे पाव के निचे कोई जमीन नही है, कमाल ये है फिर भी तुम्हे यकीन नही है’, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अहंकार असलेले लोक मोदीवर आरोप करत आहेत. मोदींना शिव्या देऊन काही तरी मार्ग निघेल, असे काहींना वाटत आहे. मोदीवरचा विश्वास टीव्हीवरील चेहऱ्यामुळे दृढ झालेला नाही, असे मोदी यांनी विरोधकांना सुनावले.

हेही वाचा 

Back to top button