अदानी प्रकरणी सलग चौथ्या दिवशी संसदेत पडसाद | पुढारी

अदानी प्रकरणी सलग चौथ्या दिवशी संसदेत पडसाद

नवी दिल्‍ली: पुढारी वृत्तसेवा – अदानी उद्योगसमुहावर झालेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी, या मागणीवरुन संसदेत आज ( दि. ७ ) सलग चौथ्या कामकाजी दिवशी गदारोळ झाला. गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे काम बाधित झाले.

लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजास सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षांनी अदानी मुद्यावरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. गोंधळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दुपारनंतर मात्र लोकसभेचे कामकाज सुरळीत झाले. तिकडे राज्यसभेत अदानीच्या मुद्यावरुन राडेबाजी झाल्यामुळे कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत व नंतर दोनपर्यंत तहकूब झाले.

भाजप संसदीय दल बैठकीत बजेटचे कौतुक…..

संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सकाळी भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्‍थितीत झालेल्या या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाची स्तुती करण्यात आली. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य वर्गाबरोबरच गरीब लोकांचे हित साधणारा असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षीच्या मध्यात होणार आहेत. मात्र असे असूनही या अर्थसंकल्पाला कोणीही निवडणुकीच्या तोंडावरचा अर्थसंकल्प असे म्हणत नाही. उलट सर्वांगीण बजेट सादर केल्याबद्दल लोक अर्थमंत्र्यांचे आभार मानत असल्याचे मोदी म्हणाले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button