71 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 286 टक्क्यांनी वाढ | पुढारी

71 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 286 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2009 आणि 2019 दरम्यान लोकसभा निवडणुकांत विजयांची पुनरावृत्ती करणार्‍या 71 खासदारांच्या एकूण संपत्तीत सरासरी 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2009 मध्ये या 71 खासदारांची सरासरी संपत्ती 6.15 कोटी होती, 2014 मध्ये त्यात वाढ होऊन ती 16.23 कोटी रुपये झाली… आणि पुढे म्हणजे 5 वर्षांनी 2019 मध्ये या संपत्तीत 17.59 कोटी रुपयांनी वाढ होऊन ती सरासरी 23.75 कोटी रुपये झाली.

खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या हवाल्याने असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या नॅशनल इलेक्शन वॉचशीर्षकांतर्गत प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती नमूद आहे. या 71 खासदारांत भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजू जनता दलाचे 2 आणि शिवसेनेचे 2 खासदार आहेत. संयुक्त जनता दल, असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम, एआयईयूडीएफ, आययूएमएल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराचा या 71 जणांत समावेश आहे. भाजपच्या खासदारांच्या संपत्तीत या कालावधीत सरासरी 15 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

सर्वाधिक संपत्ती वाढीत संख्येच्या द़ृष्टीने 43 खासदारांसह भाजप पहिल्या, तर दुसरा मोठा पक्ष असलेला काँग्रेस 10 खासदारांसह दुसर्‍या स्थानी आहे. सर्वाधिक उत्पन्न कमावण्यात कौर आणि सुप्रिया सुळेंच्या पाठोपाठ पुरीचे भाजप खासदार पिनाकी मिश्रा यांचे नाव तिसर्‍या स्थानी आहे. त्यांच्या संपत्तीत नमूद 10 वर्षांत 87.78 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांच्याकेड 29.69 कोटी रुपये संपत्ती होती, ती 2019 मध्ये 117 कोटी 47 लाख झालेली आहे. कर्नाटकमधील बंगळूरचे खासदार पी. सी. मोहन यांच्याकडे 2009 मध्ये 5 कोटी रुपयांची संपत्ती होती, 2019 मध्ये ते 75 कोटींचे धनी बनले आहेत.

विजापूरचे भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगजिनगी यांची संपत्ती 1.18 कोटी रुपयांवरून 8.94 कोटी झाली. तीन अन्य खासदारांच्या संपत्तीतही 1100 ते 4000 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वरुण गांधींच्या संपत्तीत 1124 टक्क्यांनी वाढ झाली आहे

उड्डाणे कोटींची, मायलेकांची!

भाजपचेच वरुण गांधी यांची संपत्ती 2009 मध्ये 4.92 कोटी रुपये होती, ती 2019 मध्ये 60.32 कोटी रुपये झाली आहे. वरुण यांच्या मातोश्री तसेच भाजपच्याच सुलतानपूर येथील खासदार मनेका गांधी यांची संपत्ती 2009 मध्ये 17 कोटी रुपये होती. ती 2019 मध्ये 55 कोटी रुपये झाली आहे.

सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 89 कोटींनी वाढ

अहवालानुसार, सर्वात जास्त 157 कोटींची वाढ अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत झाली आहे. 60.31 कोटींवरून त्यांची संपत्ती 217.99 कोटी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या याबाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत 89 कोटी 35 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 51.33 कोटी रुपये होती. 2019 मध्ये ती 140 कोटी 88 लाख रुपये झाली आहे.

Back to top button