जगभरात नोकरकपात, पण ‘ही’ भारतीय टेक कंपनी कर्मचाऱ्यांवर मेहरबान, गिफ्ट केल्या लक्झरी कार | पुढारी

जगभरात नोकरकपात, पण 'ही' भारतीय टेक कंपनी कर्मचाऱ्यांवर मेहरबान, गिफ्ट केल्या लक्झरी कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु असताना एका भारतीय कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी चक्क लक्झरी कार भेट दिल्या आहेत. गुजरातच्या अहमदाबाद येथील त्रिध्या टेक (Tridhya Tech) या टेक कंपनीने १३ कर्मचाऱ्यांना १३ लक्झरी कार गिफ्ट केल्या आहेत. कंपनीने नुकतीच पाच वर्षे पूर्ण केली आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मेटा, गुगल (Google), अॅमेझॉन (Amazon) सारख्या दिग्गज कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे. पण अशा परिस्थितीत एक भारतीय टेक कंपनीने कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्याने ही कंपनी चर्चेत आली आहे.

त्रिध्या टेकचे (Tridhya Tech) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रमेश मारंड यांनी बोलताना सांगितले की, आमची कंपनी एक स्टार्टअप कंपनी होती. कंपनीच्या सुरुवातीपासूनच कंपनीसोबत राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट भेट दिल्या जात आहेत. ही आयटी कंपनी उभी करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आपल्या स्थिर नोकऱ्या सोडल्या होत्या. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी गिफ्ट म्हणून कार देण्याची पद्धत कायम राहील. आता आम्ही कंपनीच्या उर्वरित कर्मचाऱ्यांनाही कार गिफ्ट करण्याचा विचार करत आहोत.

त्रिध्या टेक ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे. ही कंपनी ई कॉमर्स, वेब आणि मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी सेवा देते. अहमदाबाद येथे असलेली ही कंपनी आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियात IT सेवा पुरवते. ५ वर्षांहून अधिक कालावधीत कंपनीने आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या कामांचा विस्तार केला आहे. BFSI, हेल्थकेअर, विमा, रिटेल आणि एनर्जी यांसारख्या उद्योगांमध्येही ही कंपनी सेवा देत आहे.

जगभरात नोकरकपात

आर्थिक मंदीची धास्ती आणि अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्यामुळे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची लाट आली आहे. Google आणि Amazon ने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नोकरकपातीसह नवीन वर्षाची सुरुवात केली. गुगलने जानेवारीत १२ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले आणि Amazon ने जाहीर केले की ते १८ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकतील. गेल्या काही महिन्यांत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी जगभरातील १ लाख ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

हे ही वाचा :

Back to top button