Delhi : खलिस्तानच्या समर्थनाचे पोस्टर्स लावणाऱ्या दोघांना अटक; दहशतवादी हल्ल्याचा गुप्तचर संस्थांचा इशारा | पुढारी

Delhi : खलिस्तानच्या समर्थनाचे पोस्टर्स लावणाऱ्या दोघांना अटक; दहशतवादी हल्ल्याचा गुप्तचर संस्थांचा इशारा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीच्या (Delhi) विविध भागात खलिस्तानच्या समर्थनाचे पोस्टर्स लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान दिल्लीत खलिस्तानचे काही स्लीपर सेल कार्यरत असून त्यांच्याकडून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दहशतवादी हल्ले घडवून आणले जाऊ शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थानी दिला आहे.

पश्चिम दिल्लीतील विकासपुरी, जनकपुरी, पश्चिम विहार, पिरागढी तसेच इतर भागात अलीकडेच खलिस्तानच्या समर्थनाचे पोस्टर्स आढळून आले होते. हे पोस्टर्स लावणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खलिस्तानच्या समर्थनाचे आक्षेपार्ह पोस्टर्स आढळल्याने पोलिसांची मात्र झोप उडाली आहे. दिल्ली आणि परिसरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी खलिस्तानच्या स्लीपर सेलना टेरर फंडिंग (Delhi) होत असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे.

खलिस्तानच्या समर्थनाचे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत, तसेच स्लीपर सेलचा छडा लावण्याच्या कामात वेग आणला गेला आहे, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींविरोधात समाजात विद्वेष पसरविणे तसेच गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या भागात पोस्टर्स आढळून आले होते, त्या भागातील पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. शिवाय अशा भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button