‘हिडेनबर्ग’चे आरोप बिनबुडाचे; नामांकित संस्थांकडून लेखापरीक्षण | पुढारी

'हिडेनबर्ग'चे आरोप बिनबुडाचे; नामांकित संस्थांकडून लेखापरीक्षण

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आमच्यावर केलेले हिशेबातील फेरफारीचे वा फसवणुकीचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत. अदानी समूहातील ९ पैकी ८ कंपन्यांचे लेखापरीक्षण सहा मोठ्या ऑडिटिंग कंपन्यांपैकी एका कंपनीतर्फे करण्यात येत असते, असा खुलासा अदानी उद्योग समूहाच्या कायदा विभागाचे प्रमुख जतिन जलुंधवाला यांनी केला आहे.

विविध क्षेत्रांमध्ये आमचा व्यवसाय पसरलेला आहे, तसेच आठ सेक्टरमध्ये आमच्या सहायक कंपन्या कार्यरत आहेत. अदानी एंटरप्रायझेसमधील विविध संस्थांचे लेखापरीक्षण २७ हून अधिक वैधानिक ऑडिट फर्म्स करीत असतात. यातील चार मोठ्या ऑडिट फर्म अत्यंत प्रतिष्ठित आहेत, असे अदानी एंटरप्रायझेस कंपनीने (एईएल) म्हटले आहे.

कंपनीने सादर केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, लेखापरीक्षणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एमआयएएल) या अदानी एअरपोर्टच्या उपकंपनीचे लेखापरीक्षण ग्रँट थॉर्नटन या संस्थेद्वारे केले जाते, तर इतर सहा विमानतळांचे लेखापरीक्षण हे गायेंद्र अँड कंपनी या कंपनीद्वारे एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया पॅनेलच्या तरतदींनसार केले जाते. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या निवेदनात हे सर्व नमूद केले आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या म्हणण्यानुसार, हिंडेनबर्गने उपस्थित केलेले २१ प्रश्न आणि न्यायालयीन प्रकरणांचे संदर्भ हे मुळात आमच्या समूहातील कंपन्यांनी स्वतःच केलेले सार्वजनिक खुलासे आहेत. आमच्या विविध कंपन्यांपैकी १०० कंपन्यांना मूडीजसह इतर मोठ्या रेटिंग कंपन्यांनी मानांकन दिलेले आहे. आमच्या समूहातील कंपन्यांचा महसूल आणि भांडवली खर्च या गोष्टी संबंधित क्षेत्रातील नियामकांकडून व सेबी, बीएसई किंवा एनएसई यांच्याकडन सतत तपासल्या जात असतात.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे निर्माण झालेली भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे भारतीय नागरिकांना मोठा त्रास झाला आहे. हा अहवाल आणि त्यातील अप्रमाणित मजकूर हा अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर मूल्यांवर घातक परिणाम करण्यासाठी मुद्दाम तयार करण्यात आला आहे. अदानी समभागांच्या घसरणीचा फायदा घेण्याचा स्वतः हिंडनबर्ग रिसर्चचाच उद्देश आहे, असेही जलुंधवाला यांनी म्हटले आहे.

Back to top button