4 जी, 5 जी : एकाच वेळी एक कोटी मोबाईल संचांची चाचणी | पुढारी

4 जी, 5 जी : एकाच वेळी एक कोटी मोबाईल संचांची चाचणी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचनेच्या माध्यमातून एकाच वेळी एक कोटी 4 जी व 5 जी मोबाईल संच हाताळण्याची यशस्वी चाचणी पार पडलेली असून, हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील सहावा देश बनला आहे. पुढील वर्षांपासून 5 जी तंत्रज्ञान प्रणालीची निर्यातही केली जाणार आहे, असे केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्यातून सी डॉट आणि टाटा समूहातील टीसीएसने मिळून देशातील दूरसंचार तंत्रज्ञान विकसित केले आहे. अमेरिका, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया आणि चीननंतर स्वत:ची दूरसंचार तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला आहे. स्वीडन, फिनलंड, चीन, द. कोरियाच्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल, अशी आपली यंत्रणा असल्याचा दावाही वैष्णव यांनी केला. केंद्र सरकारच्या बीएसएनएल कंपनीद्वारे 2023 मध्ये देशभर 4 जी व 5 जी दूरसंचार सेवा पुरवली जाईल. वर्षभरात 50 हजार ते 70 हजार मोबाईल टॉवर उभारले जातील, असेही ते म्हणाले.

गांधीनगरमध्ये सीआयआय आयोजित बी-20 समिटमध्ये ते बोलत होते. सध्या देशात जिओ, एअरटेल, व्होडाफोन या खासगी कंपन्या 4 जी व 5 जी सुविधा पुरवत आहेत, हे येथे उल्लेखनीय!

Back to top button