राज्यातील साखर उद्योगाच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

राज्यातील साखर उद्योगाच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील साखर उद्योगाचे मार्जिन मनी, खेळते भांडवल, कर्जाची पुनर्रचना यासोबतच कारखान्यांचे आयकरसंबंधी प्रलंबित मुद्दे आदी प्रश्नांवर आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील साखर उद्योगाबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत साखर कारखान्यांच्या समस्यांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर दिली.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील तसेच इतर नेते हजर होते. या बैठकीत इथेनॉल तसेच को-जनरेशन स्टँड अलोन लोनसंदर्भात चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील साखर उद्योगाला आणखी बळकट करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. साखर उद्योगाला भेडसावणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी सहकारमंत्र्यांनी आश्वस्त करणारी भूमिका घेतली. आठवड्याभरात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला. साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी आजची बैठक होती, बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असेदेखील स्पष्ट केले.

नव्याने नोंदणीकृत प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने 20 वेगवेगळे मुद्दे या सोसायट्यांना मिळणार आहेत. या सोसायट्या त्यामुळे बळकट होतील आणि कृषी व्यवसाय सोसायट्यांमध्ये परिर्वतन होतील, त्यामुळे सहकार गावपातळीपर्यंत रुजेल. यासंदर्भात महाराष्ट्राने पुढाकार घेण्याच्या सूचना शहा यांच्याकडून देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

 

Back to top button