Delhi NCR Earthquake : दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली, रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेची नोंद | पुढारी

Delhi NCR Earthquake : दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली, रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेची नोंद

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसर आज मंगळवारी दुपारी २.२८ वाजता भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरला. (Delhi NCR Earthquake) या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.८ इतकी आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमीवर खोलीवर आहे. याचे धक्के दिल्ली परिसराला जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नोएडा फिल्म सिटीतील कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीआरमध्ये ३० सेकंदपर्यंत याचे धक्के बसले. लखनौमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये उत्तराखंडच्या पिथौरागढपासून १४८ किमीवर पूर्वेला होता. दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांनी एका मिनिटापेक्षा कमी कालावधीच्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये घरातील वस्तू हलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Delhi NCR Earthquake)

यापूर्वी दोनवेळा राजधानी दिल्लीला भूकंपाचे धक्के

२० दिवसानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी २ जानेवारीला अफगाणिस्तानमधील हिंदकुश प्रदेशात ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. याचे धक्के राजधानी दिल्लीत जाणवले होते. याच महिन्यात १ जानेवारीच्या मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी हरियाणाच्या वायव्य भागात झज्जर येथे भूकंप झाला होता.

दिल्लीसह पाच राज्यांना भूकंपाचे धक्के

दिल्लीसह उत्तरेकडील उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शेजारील देश चीनमध्येही अनेक भागात या भूकंपाने जमिन हादरली आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून राजधानी दिल्लीतील ही भूकंपाची तिसरी घटना आहे.

Back to top button