चाय पे... नव्हे, यंदा परीक्षा पे चर्चा; पंतप्रधानांचा २७ जानेवारीला विद्यार्थ्यांशी संवाद | पुढारी

चाय पे... नव्हे, यंदा परीक्षा पे चर्चा; पंतप्रधानांचा २७ जानेवारीला विद्यार्थ्यांशी संवाद

भाईंदर; राजू काळे :  येत्या २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा चाय पे…. नव्हे तर परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहता यावा, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाने राज्यातील सर्व शाळांना त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन देखील करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने प्रत्येक स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ जा- नेवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत देशातील प्रत्येक केंद्रीय शाळेतील किमान १०० विद्यार्थी याप्रमाणे ५०० केंद्रीय शाळांमधील एकूण ५० हजार विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धामध्ये संपूर्ण देशपातळीवर सहभाग नोंदवावा. तसेच राज्यातील ६० केंद्रीय विद्यालयांमध्ये परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय तसेच क्षेत्रीय स्तरा- वरील अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. हि स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी किमान ५०० ते १००० विद्यार्थी एकत्र बसू शकतील, अशा शाळेचे मोठे सभागृह, मैदान, मंगल कार्यालय, समाज मंदिर या ठिकाणी शक्य असल्यास तालुका स्तरावर अथवा केंद्र स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्याची सूचना देण्यात शिक्षण आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे.

स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तत्पूर्वी सर्व स्थानिक प्रशासनांनी स्पर्धेच्या ठिकाणांची नावे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे तसेच त्यांच्या येण्या, जाण्याबाबतच्या वाहतुकीचे नियोजन आदींसह चित्रकला स्पर्धा आयोजनाच्या पूर्वतयारीचा जिल्हानिहाय अहवाल पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

Back to top button