युक्रेन, रशियाला फक्त मोदीच चर्चेसाठी तयार करू शकतात : फ्रेंच पत्रकार लॉरा हाईम | पुढारी

युक्रेन, रशियाला फक्त मोदीच चर्चेसाठी तयार करू शकतात : फ्रेंच पत्रकार लॉरा हाईम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  युक्रेन आणि रशियात सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन देशांना चर्चेसाठी तयार करणे आवश्यक असून हे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असे उद्गार विख्यात व ज्येष्ठ फ्रेंच पत्रकार लॉरा हाईम यांनी काढले आहेत. त्या म्हणाल्या की, मोदी यांनी पुढाकार घेतला तर दोन्ही देशांचे नेते चर्चेसाठी समोर येतील अशी खात्री आहे.

लॉरा हाईम या फ्रान्सच्या एलसीआय न्यूज या वृत्तवाहिनीच्या पत्रकार आहेत. त्यांनी फ्रान्सच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या परराष्ट्रविषयक प्रवक्त्या म्हणून काम पाहिले आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी सध्या सुरु असलेल्या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका जगासाठी खूप महत्त्वाची असेल असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, आज स्थिती अशी आहे की, झुंजणार्‍या दोन्ही देशांना चर्चेसाठी टेबलवर आणले पाहिजे. पण रशिया ऐकायला तयार नाही आणि युक्रेनही पुतीन यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची भाषा करत आहे. अशा स्थितीत त्यांना चर्चेला तयार करणारे नेतृत्व जागतिक पातळीवर पुढे यायला हवे. ही क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे. कारण दोन्ही देशांच्या प्रमुखांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जर मोदी यांनी पुढाकार घेतला तर पुतीन आणि झेलेन्स्की चर्चेसाठी समोर येतील असेही त्या म्हणाल्या.

Back to top button