बीबीसीच्या माहितीपटातून पीएम मोदींबाबत अपप्रचार : परराष्ट्र मंत्रालय | पुढारी

बीबीसीच्या माहितीपटातून पीएम मोदींबाबत अपप्रचार : परराष्ट्र मंत्रालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जागतिक वृत्तसंस्था बीबीसीवर सडकून टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवलेल्या एका माहितीपटावरून बीबीसीला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. पीएम मोदी यांच्यावर बनवलेला माहितीपट हा एक अपप्रचाराचा भाग असून त्यात वस्तुनिष्ठता नाही. वसाहतवादी मानसिकता यामध्ये स्पष्टपणे दिसून येते, असे स्पष्ट मत मंत्रालयाने मांडले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बीबीसीची निर्मिती असलेला ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला होता. यात पीएम मोदी यांच्या राजकीय आणि सत्तेपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा माहितीपटाच्या दोन भागांमध्ये घेण्यात आला आहे. टीकेची झोड उठल्यानंतर या माहितीपटाचा व्हिडिओ युट्युबवरून हटवण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियात मंदिरांची तोडफोड

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात नुकतीच काही मंदिरांची तोडफोड करण्यात आली. त्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. ऑस्ट्रेलियन नेते, कम्युनिटी नेते आणि तिथल्या धार्मिक संघटनांनीही याचा जाहीर निषेध केला आहे. आमच्या मेलबर्नमधील वाणिज्य दूतावासाने या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली आहे. आम्ही दोषींविरुद्ध त्वरीत तपास आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियन सरकारकडेही नेण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले.

Back to top button