दावोसमध्ये 88,420 कोटींचे करार

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
Published on
Updated on

दावोस, पुढारी वृत्तसेवा : दावोस येथे मंगळवारी दुुपारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूक करार झाले. इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भातही चर्चा झाली आहे.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लीनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपयांचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प (रोजगार 15 हजार), ब्रिटनच्या वरद फेरो अ‍ॅलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे 1 हजार 520 कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार 2 हजार), इस्रायलच्या राजुरी स्टील्स अँड अ‍ॅलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 600 कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार 1 हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अ‍ॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे 400 कोटी रुपयांचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार 2 हजार) तसेच गोगोरो इंजिनिअरिंग आणि बडवे इंजिनिअरिंगचा 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ऑटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार 30 हजार), अशा काही करारांवर मंगळवारी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपान बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत, त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तमप्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढवण्यासंदर्भातही मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली. मुंबई ते नागपूर यादरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याविषयी मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्याची माहिती दिली. सिंगापूरच्या माहिती व दूरसंचारमंत्री श्रीमती जोस्फाईनही मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.

'एमओयूं'मुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत गुंतवणूक आणि रोजगार : मुख्यमंत्री

दावोस येथे पहिल्याच दिवशी 45 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले; तर दोन दिवसांत 88 हजार कोटींचे करार झाल्याने महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे येथे 250 कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडस्चा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्न प्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

औरंगाबाद येथे 12 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नवीनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे 6 हजार 300 जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर-हाथवे या उद्योगाच्या 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, नागरी विकासाला चालना मिळणार आहे.

पुण्याजवळ जपानच्या निप्रो कॉर्पोरेशन या उद्योगाचा 1 हजार 650 कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे महाराष्ट्रातील औषधनिर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे 2 हजार रोजगारनिर्मिती होईल. मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.

बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news