Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी | पुढारी

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी

पुढारी ऑनलाईन: पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे? या ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी झाली. यावर पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे. सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर, शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर बाजू मांडली.

शिंदे गटाच्या कागदपत्रेत त्रूटी- कपिल सिब्बल

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी आहेत असे म्हटले आहे. तसेच याचिकेत त्रुटी असल्याने कागदपत्रांची छाननी करावी अशी त्यांनी मागणी केली. याव्यतिरिक्त काही आमदार पक्षातून बाहेर पडले याचा अर्थ पक्ष फुटला, असा होत नाही. सेनेतील फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम नाही. शिवसेनेचे सर्व आमदार धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून आले आहेत. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काही अस्तित्व नाही. शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना आहे, असा युक्तिवाद करत आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच आपला निकाल द्यावा अशी मागणी केली.

कागदपत्रात त्रूटी नाही – महेश जेठमलानी

शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणतीही त्रूटी नाही, असे म्हणत महेश जेठमलानी यांनी कपिल सिब्बल यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. शिंदे गटाकडून सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला गेला आहे. तसेच याआधीच्या काही प्रकरणांचा दाखला देण्यात आला आहे. पक्षातून एखादा मोठा गट लोकसंख्येच्या आधारे बाहेर पडला तर त्यात चूकीचे काही नाही असे म्हटले आहे. तर संख्याबळ असल्याने लवकर निर्णय द्यावा

निवडणूक आयोगच निर्णय देऊ शकते – सादिक अली प्रकरण

सादिक अली प्रकरणाचा गेल्या सुनावणीत देखील दाखला देण्यात आला आहे. हे प्रकण काँग्रेसचे होते आणि त्यावेळी न्यायालयाने याबाबत निर्णय देण्याचे सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत, निवडणूक आयोगच निर्णय देऊ शकते असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा वारंवार दाखला देण्यात येत आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: दोन्ही गटांना तात्पुरते नाव अन् चिन्ह

यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान, शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. दरम्यान, अंधेरी मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबरला दिलेल्या निर्णयात दोन्ही गटासाठी तात्पुरत्या स्वरूपात नाव चिन्हाची घोषणा केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले होते. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि हे नाव आणि ‘ढाल आणि तलवार’ हे चिन्ह देण्यात आले आहे. अद्यापही या दोन्ही गटाकडून याच नाव आणि चिन्हांचा वापर करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोग जेव्हा अंतिम निर्णय घेईल तेव्हा कोणत्यातरी एका गटाला एखाद्या वेळेस मूळ ‘शिवसेना’ हे नाव आणि त्याचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह पुन्हा मिळू शकते. मात्र, निवडणूक आयोगाकडे आलेली दोन्ही गटाचे सर्व म्हणणे व कागदपत्रे तपासल्यानंतरच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

Back to top button