Joshimath : तीन कोटींच्या बंगल्यातील कुटुंब आता अवघ्या दोन सरकारी खोल्यांमध्ये! | पुढारी

Joshimath : तीन कोटींच्या बंगल्यातील कुटुंब आता अवघ्या दोन सरकारी खोल्यांमध्ये!

जोशीमठ; वृत्तसंस्था : तीन कोटी खर्चून स्वत: साठी जोशीमठात बंगला बांधला होता. खडकावर बंगला आहे. हलणार नाही, अशा भ्रमात परमार कुटुंब होते. पडलेल्या भेगा दिवसागणिक रुंदावत आहे. पावसाचे पाणी त्यात झिरपले आहे. खडक हलला आहे. आता या ३५ खोल्यांच्या बंगल्यातील कुटुंबाला सरकारने १२ खोल्यांत राहावे लागत आहे.

उत्तराखंडच्या जोशीमठातील १०० च्या जवळपास कुटुंबांचे छत हिरावले गेले. २ जानेवारीला रात्री घरांमध्ये पडलेल्या भेगा दिवसागणिक रुंदावत चालल्या आहेत. पावसानंतर ही घरे कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. कोट्यवधी खर्चून बांधलेले बंगले पत्त्यांच्या इमल्याप्रमाणे कोसळतील. घरांच्या भेगांमध्ये शिरणारे पावसाचे पाणी केव्हा पाया उखडून टाकेल, याचा भरवसा नाही. हवामान खात्याने उत्तराखंडच्या डोंगराळ भागात २ दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ११ जानेवारीला रात्री येथे पाऊसही झाला.

गुरुवारी तसेच शुक्रवारीही सकाळपासूनच लोकांचे शिफ्टिंग सुरू होते. शंकराचार्य मठाच्या आसपास कपाट, बेड, बॉक्स, गॅस सिलिंडर, गाद्या घेऊन लोक सरकारी खोल्यांकडे तर काही नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाले होते. मनोहरबाग येथील नीलम परमार यांचे घरही धोक्यात आहे. रेडक्रॉस लावलेला आहे. ३५ खोल्या असलेला त्यांचा बंगला आहे. सोडावा लागतो आहे.

काय न्यावे काय नेऊ नये, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सारेच गरजेचे आहे, सारेच मूल्यवान आहे, असे त्या सांगतात. सरकारने त्यांना २ खोल्या दिल्या आहेत. त्यांत परमार कुटुंब शिफ्ट झाले आहे. जोशीमठात कधी काळी रंगत होती, आता वेदनाच वेदना आहेत.

Back to top button