ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ९ डॉक्टरांना मंगळुरात अटक | पुढारी

ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ९ डॉक्टरांना मंगळुरात अटक

बंगळूर; वृत्तसंस्था :  ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ९ डॉक्टरांना अटक करण्यात आल्याची घटना मंगळूरमध्ये घडली. पोलिसांनी गांजा तस्करीबाबत पकडलेल्या एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनंतर पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नील किशोरीलाल या व्यक्तीला गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान मंगळूरमधील अनेक डॉक्टर ड्रग्जची तस्करी व वापर करत असल्याचे सांगितले होते. त्याची खातरजमा केल्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी ही कारवाई केली.

नील किशोरीलाल हा ब्रिटिश नागरिक असून तो मागील १७ वर्षांपासून मंगळूरमध्ये राहतो. तो शहरात गांजा आणायचा व विकायचा. वैद्यकीय शिक्षण घेणारे काही विद्यार्थी हे रॅकेट चालवायचे. त्यात काही महिला डॉक्टरही आहेत. पोलिस आयुक्त शशिकुमार यांनी सांगितले की, नीलच्या घरावर छापा टाकला तेव्हा पोलिसांनी ५० हजार रु. किमतीचा २ किलो गांजा, काही मोबाईल फोन्स आणि सात हजार रु. रोख असा ऐवज हस्तगत केला. त्याने लोकांना धाक दाखवण्यासाठी नकली पिस्तूलही बाळगले होते. त्याची चौकशी केल्यावर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर छापे टाकण्यात आले. अटक करण्यात आलेले ९ जण २२ ते ३२ वयोगटातील असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Back to top button