दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या यापुढे पाहा सेट टॉप बॉक्सविना | पुढारी

दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या यापुढे पाहा सेट टॉप बॉक्सविना

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या पाहण्यासाठी यापुढे सेट टॉप बॉक्सची गरज नाही. त्यासाठी इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असलेले टी.व्ही. उत्पादकांना तयार करावे लागणार आहेत. भारतीय मानक संस्थेने टी.व्ही.साठी ठरवलेल्या नवीन मानकांत याचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या मोफत असो की सशुल्क वाहिन्या असोत, त्या बघण्यासाठी ग्राहकांना डिश अँटेना व सेट टॉप बॉक्स खरेदी करावाच लागतो. फक्त मोफत वाहिन्या बघण्यासाठीही हा खर्च करावाच लागतो. यात आता सुधारणा करण्यासाठी भारतीय मानक संस्थेने टी.व्ही.बाबत नवीन मानके निर्धारित केली आहेत. त्यानुसार ग्राहकांना आता दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या बघण्यासाठी सेट टॉप बॉक्सचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. एक छोटासा डिश अँटेना छतावर बसवावा लागेल. मोफत वाहिन्या पाहता याव्यात यासाठी टी.व्ही. संचातच सॅटेलाईट ट्यूनर असेल. याचाच अर्थ आता येणार्‍या टी.व्ही. संचांत इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असतील. त्यासाठी टी.व्ही. कंपन्यांना उत्पादनात काही बदल करावे लागतील. मात्र, त्यामुळे दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या सेट टॉप बॉक्सविना प्रेक्षकांना पाहता येतील.

दुसरीकडे, सध्या दूरदर्शन जुन्या तंत्रावर आधारित अ‍ॅनालॉग प्रसारण टप्प्याटप्प्याने बंद करून डिजिटल होत आहे. त्याचाही या निर्णयाला फायदा होणार आहे. मनोरंजनासह शैक्षणिक, विविध विषयांना वाहिलेल्या दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या देशभरातील नागरिकांना विना सेट टॉप बॉक्स बघता येणार आहेत.

Back to top button